इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
देशातील ११.५७ कोटी जनधन खाती बंद होणार असल्याचे वृत्त प्रसिध्दी झाल्यानंतर त्यावर आता केंद्रीय अर्थमंत्रालयानं स्पष्टीकरण दिले आहे. सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी ही खाते बंद करण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. या खात्याचा गैरवापर होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. त्यानतंर केंद्राने हा खुलासा केला.
निष्क्रीय असलेली प्रधानमंत्री जनधन बँक खाती बंद करण्याचे कोणतेही निर्देश बँकांना दिलेले नाहीत, असे केंद्रीय अर्थमंत्रालयानं स्पष्ट केलं. वित्तीय सेवा विभागानं अशी खाती बंद करायला सांगितल्याचं वृत्त माध्यमांमधून प्रसारित झाल्यानंतर मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं आहे. निष्क्रीय जनधन खात्यांच्या संख्येवर मंत्रालयाची देखरेख असून संबंधित खातेदारांशी संपर्क साधून त्यांची खाती कार्यरत ठेवण्याचा सल्ला वेळोवेळी देण्यात येत असल्याचंही मंत्रालयाने म्हटलं आहे.