नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समाजात फूट पाडणे, जातीय विद्वेषाचे वातावरण तयार करणे यामध्ये कार्यक्षम असल्याचे खळबळजनक निरीक्षण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने आपल्या पुस्तकात केला आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी दिलेली एक मुलाखत चांगलीच गाजत आहे. हा केंद्र सरकारला घरचा आहेर असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
निर्मला सीतारामन यांचे पती डॉ. परकला प्रभाकर यांच्या ‘The Crooked Timber Of New India : Essays on a Republic in Crisis’ या पुस्तकाचे १५ मे रोजी लोकार्पण होणार आहे. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत अनेक धक्कादायक निरीक्षणं त्यांनी नोंदविली आहेत. विशेष म्हणजे पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत बरीच स्पष्ट मते नोंदवली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात अकार्यक्षम कारभार सुरू आहे. पंतप्रधान अर्थव्यवस्थेतच नाही तर इतर अनेक आघाड्यांवर अकार्यक्षम ठरले आहेत, असेही त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे.
विशेष म्हणजे डॉ. परकला प्रभाकर हे देशाच्या अर्थ्यमंत्र्यांचे पती असून त्यांनी अर्थव्यवस्थेच्या बाबतीतही सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘मोदी सरकारच्या काळात सर्वच चुकीचे घडले असे मी म्हणणार नाही. महागाईचा दर सध्या सहा ते सात टक्क्यांच्या घरात आहे. पण बेरोजगारीचा दर सात टक्क्यांच्या वर गेला आहे. युवकांच्या बेरोजगारीचा आकडा यापेक्षा अधिक आहे. अशावेळी डिजिटल व्यवहारांमध्ये झालेली वाढ, काही घटकांना दिलेले अनुदान अशा चांगल्या बाबी आणि समस्या एकाच चष्म्यातून पाहता येणार नाहीत.
महागाई, युवकांची बेरोजगारी हे आपल्यासमोरचे मोठे प्रश्न आहेत. या परिस्थितीत सरकारी संस्थांचे होणारे खासगीकरण, मागणी आणि पुरवठा यात झालेला कमालीचा गोंधळ यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत कमालीची अनागोंदी माजली आहे,’ असे स्पष्ट मत मत डॉ. परकला प्रभाकर यांनी व्यक्त केले.
नोटाबंदी कुणाच्या सल्ल्याने?
आज मोदी सरकारला कोणते अर्थतज्ज्ञ सल्ला देत आहेत, याची मला कल्पना नाही. कोणत्या अर्थतज्ज्ञांचा सल्ला ऐकून त्यांनी नोटाबंदीसारखा अव्यवहार्य निर्णय घेतला, हे कळलेच नाही. काळा पैसा रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. पण तुम्ही कोणत्याही अर्थतज्ज्ञाला विचारा, काळा पैसा हा रोखीमध्ये असतो का?, असा सवाल डॉ. प्रभाकर यांनी या उपस्थित केला आहे.
अर्थमंत्र्यांवर टीका?
अर्थव्यवस्थेबाबत सरकारचे मंत्री चुकीची माहिती लोकांसमोर ठेवत आहेत. कोरोना महामारीआधी असलेला आपला जीडीपी आणि आजच्या जीडीपीमध्ये खूप अंतर आहे. आपण महामारीच्या आधीचा जीडीपी अद्याप गाठलेला नाही. भारतीय जनता पार्टीकडे सुरुवातीपासून आर्थिक तत्त्वज्ञान किंवा तसा सुसंगत विचार नव्हता. मी कुणा एका व्यक्तीबद्दल हे बोलणार नाही. पंतप्रधानांना जबाबदार धरेन, कारण ते या सरकारचे प्रमुख आहे. देशात चाललेल्या बऱ्या-वाईट घटनांना ते थेट जबाबदार आहेत, असेही अर्थमंत्र्यांचे पती म्हणाले.
देश मूल्यांपासून दूर जातोय
देशात चाललेल्या चुकीच्या घटनांकडे लक्ष वेधण्यासाठी हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. आपला देश सध्या चिंताजनक परिस्थितीतून जात आहे. प्रजासत्ताक भारताने आखून दिलेली तत्त्वे आणि मूल्यांपासून आपण दूर जात आहोत. देशात सध्या जे काही चालू आहे, त्यावरून मला हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. मी फक्त देशात काय चुकीचे सुरू आहे ते लोकांसमोर मांडले, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Finance Minister Nirmala Sitharaman Husband Book