नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रातील मोदी सरकारने आज सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात आज मोठ्या कपातीची घोषणा केली आहे. पेट्रोलचे उत्पादन शुल्क तब्बल ८ रुपये तर डिझेलचे उत्पादन शुल्क तब्बल ६ रुपयांनी कमी करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९.५ रुपये आणि डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होणार आहेत. याशिवाय, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ९ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर (१२ सिलिंडरपर्यंत) २०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, यामुळे आपल्या माता-भगिनींना मदत होईल.
देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीमध्ये १२३.४६ रुपये प्रति लिटर, तर आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये डिझेल १०७.६१ रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी, पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल ९१.४५ रुपये आणि डिझेल ८५.८३ रुपये प्रति लिटर होते. त्याच वेळी, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर १०५.४१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर आज ९६.६७ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल १२०.५१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल १०४.७७ रुपये दराने विकले जात आहे. मात्र, आता उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहेत.