इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क –
सध्या बॉक्स ऑफिसवर ऋषभ शेट्टी यांच्या ‘कांतारा’ची धूम आहे. कोरोनामुळे आलेल्या मरगळीनंतर प्रेक्षकांचा हा प्रतिसाद आनंदकारक आहे. मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी देखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. हा चित्रपट सर्वप्रथम कन्नड भाषेमध्ये प्रदर्शित झाला. मात्र प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादानंतर इतर भाषांमध्ये चित्रपट डब करुन प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. भविष्यात या चित्रपटाचा सिक्वेल येऊ शकतो अशी माहिती ऋषभ शेट्टी यांनी एका कार्यक्रमामध्ये दिली होती.
सध्या हा चित्रपट वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. ‘कांतारा’मधील ‘वराह रुपम’ हे गीत फार विशेष आहे. या गाण्यामध्ये श्रीविष्णू यांच्या वराह अवताराची स्तुती आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे. मात्र, हेच गाणं चित्रपटातून काढण्याचे आदेश केरळमधील सत्र न्यायालयाने दिले आहेत. चित्रपटामध्ये या गाण्याला खास महत्त्व आहे. अजनीश लोकनाथ यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे. तर साई विघ्नेश यांनी त्यासाठी पार्श्वगायन केले आहे. त्याचं झालं असं की, काही दिवसांपूर्वी ‘थाईकुडम ब्रिज’ या केरळमधील म्युझिकल बँडने ‘कांतारा’च्या निर्मात्यांवर गाणं चोरल्याचा आरोप केला होता. ‘वराह रुपम’ हे गाणं २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘नवरसम’ या गाण्याची कॉपी असल्याचे त्यांनी म्हटले होते. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट व्हायरल होऊन सोशल मीडियावर त्यांना पाठिंबा मिळत आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासोबतच या बँडने चित्रपटाच्या निर्मात्यांच्या विरोधामध्ये न्यायालयात धाव घेतली. त्यावरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला.
केरळमधील कोझिकोड सत्र न्यायालयाने चित्रपटातील ‘वराह रुपम’ हे गाणं काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशामुळे चित्रपटगृह तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर चित्रपट पाहात असताना हे गीत दिसणार नाही. बँडच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरच्या यासंबंधीच्या पोस्टमध्ये “कोझिकोड जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांनी कांतारा चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, अॅमेझॉन, यूट्यूब, स्पॉटिफाय, विंक म्युझिक, जिओ सावन आणि इतर माध्यमांना थाईकुडम ब्रिजच्या परवानगीशिवाय ‘वराह रुपम’ हे गाणं वाजवण्यास सक्त मनाई केली आहे”, असे लिहिले आहे.