गुवाहाटी – आसामच्या मुख्यमंत्रीपदासाठी अखेर हिमंत बिस्वा सरमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजप विधीमंडळ गटनेत्यांच्या बैठकीत सरमा यांची विधीमंडळ गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. सरमा आता राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. रविवारी सकाळी ११ वाजता दिसपूर येथे भाजपच्या विधीमंडळ दलाची बैठक पार पडली यात हा निर्णय घेण्यात आला.
सरमा यांची राजकीय कारकिर्द २००१ पासून सुरू झाली. १९९६ मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली होती. पण, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर २००१ मध्ये त्यांनी जालुकबरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. आता ते सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. गोगोई सरकारमध्ये ते मंत्रीही होते. त्यानंतर राज्यातील काँग्रेसचे बडे नेते म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली. पण, मतभेद झाल्यामुळे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
१ फेब्रुवारी १९६९ मध्ये त्यांचा जन्म झाला असून त्यांनी ५२ वर्षे पूर्ण केले आहे. सरमा यांनी कामरुपमध्ये अकादमी स्कूलमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले. तर गुवाहाटीतून महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे. राजकारणात असतानाच त्यांनी पीएचडीही केली. त्यांचे वडील कैलाशनाथ सरमा हे साहित्यिक होते. त्यांची आई आसाम येथील साहित्य संस्थांशी संबंधित आहे. त्यांनी गुवाहाटी हायकोर्टात प्रॅक्टिस केली आहे. १९९६ ते २००५ पर्यंत त्यांनी वकील म्हणून काम पाहिले आहे.