नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डिजिटल चलनामध्ये सर्वात वेगाने प्रसिद्ध होणाऱ्या क्रिप्टो करन्सीचे भारतात भवितव्य आहे का, असेल तर काय असेल याविषयी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वक्तव्य केले आहे. क्रिप्टो करन्सीचा दुरुपयोग होण्याची शक्यता असल्याने भारतात या डिजिटल चलनाच्या नियमनाबाबत पूर्ण विचार करून निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे. क्रिप्टो करन्सीबाबतचा निर्णय घाईने घेतला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना दिले.
सीतारमण म्हणाल्या, की जी काही उपलब्ध माहिती आहे त्या माहितीच्या आधारावरूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल, हे आम्हाला सुनिश्चित करायचे आहे. त्यामध्ये घाई केली जाऊ शकत नाही. त्यासाठी वेळही लागू शकतो. ब्लॉकचेनशी संबंधित तंत्रज्ञानामध्ये नावीन्य आणण्यासाठी आणि प्रगत करण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे.
अर्थमंत्री म्हणाल्या, की क्रिप्टोशी संबंधित नावीन्य प्रभावित करण्याचा आमचा उद्देश नाही. मनी लाँड्रिंग किंवा दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा करण्यासाठी क्रिप्टो करन्सीमध्ये फेरफार केली जाऊ शकते. या काही चिंता करण्यासारख्या गोष्टी आहेत. परंतु या फक्त भारतासाठीच नव्हे, तर जगातील अनेक देशांसाठी या चिंता आहेत. विविध व्यासपीठावर याबद्दल चर्चाही झाली आहे.
विशेष म्हणजे भारत रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून डिजिटल चलन (सीबीडीसी) सादर करण्याची योजना आखत आहे.
एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेच्या विलिनीकरणाबद्दल सीतारमण म्हणाल्या, की हा चांगला निर्णय आहे. कारण भारतात पायाभूत सुविधेच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या बँकांची गरज आहे. कोविड मृतांच्या संख्येची योग्य माहिती येऊ न शकल्याबद्दल विचारले असता, त्या म्हणाल्या, की राज्य सरकारांनी दिलेल्या आकडेवारीवरून मृतांची आकडेवारी देण्यात आली आहे. राज्य सरकारांनी आकड्यांमध्ये थोडा बदल केल्यानंतर एकूण आकडेवारी बदलण्यात आली. कोविडमुळे काही रुग्णांचा मृत्यू घरांमध्ये झाला, ती माहिती नंतर राज्यांनी अद्ययावत केली.