इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमधील लोकांचे अंडरवर्ल्डसोबत लागेबांधे असणे हे काही नवीन नाही. यामुळे अनेकदा हे लोक अडचणीत सापडत असतात. तर काहीजण आर्थिक गैरव्यवहार केल्याने कारवाईचे धनी होतात. चित्रपट निर्माता जसप्रीत सिंग उर्फ बंटी वालिया हा देखील असाच कायदेशीर कचाट्यात अडकला आहे. त्याच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. बँकेने त्याच्यावर ११९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. बंटीच्या कंपनीला दोन कर्ज मंजूर झाले होते आणि त्यानंतर झालेल्या नुकसानीची भरपाई केली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
काय आहे गुन्हा?
बंटी वालियाने ११९ कोटी रुपयांची बँकेची फसवणूक केली असून याच प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले. जून २००८ मध्ये वालिया आणि इतरांच्या वैयक्तिक हमीवर दोन कर्जे घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संजय दत्त आणि बिपाशा बसू या दोघांना घेऊन केलेल्या ‘लम्हे’ चित्रपटासाठी हे कर्ज घेण्यात आले होते. वालियाची कंपनी जीएस एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडने या चित्रपटाच्या निर्मितीसाठी वित्त योजनेअंतर्गत २३.५ दशलक्ष डॉलर्सचे विदेशी चलन कर्ज आणि ४.९५ कोटी रुपयांचे आरटीएल जारी केले होते.
आपसातील वादामुळे रखडले प्रदर्शन
‘लम्हे’ चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित करण्याची योजना होती, परंतु प्रवर्तक आणि प्रदर्शकांमधील वादामुळे त्याचे प्रदर्शन रखडले. यानंतर, ३० सप्टेंबर २००९ रोजी, हे खाते नॉन-परफॉर्मिंग ऍसेट बनले. बँकेने GSEPL, PVR आणि खासगी बँक यांच्यातील त्रिपक्षीय करारावर तोडगा काढत जगभरात हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी पीव्हीआरची वितरक म्हणून नियुक्ती केली. तसेच पोस्ट-प्रॉडक्शनसाठी ८ कोटी रुपये गुंतवण्याचा शब्द त्यांच्याकडून घेतला.
बँकेत हेराफेरीचा आरोप
पीव्हीआरने आपला शब्द पाळला नसल्याचा बँकेचा आरोप आहे. कंपनीचे एकूण उत्पन्न केवळ ७.४१ कोटी रुपये होते, तर कंपनीने जाहिरात आणि वितरणावर ८.२५ कोटी रुपये खर्च केले होते त्यामुळे त्यांचे सुमारे ८३.८९ लाख रुपयांचे नुकसान झाले. याबरोबरच कंपनीने ‘बनावट वापर प्रमाणपत्र’ सादर केल्याचे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये उघड झाले. बँकेचा निधी वळवला आणि खाते पुस्तकांमध्ये फेरफार केली असा बॅकेने आरोप केला.
या सोबतच बंटी वालिया याच्या कंपनीवर खोटेपणा, रेकॉर्डमध्ये हेराफेरी, सार्वजनिक पैशांचा गैरवापर, चुकीची माहिती देणे असे आरोप आहेत. ज्यामुळे कर्ज फसवणूक झाल्याचे घोषित करण्यात आले. सीबीआयने या प्रकरणात वालिया, जीएसईपीएल आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलमांतर्गत गुन्हेगारी कट, आणि फसवणूक तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.
Film producer Bunty Walia FIR CBI