मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. या दौऱ्यादरम्यान जनरल इलेक्ट्रिक आणि हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे भारतीय तेजसला अमेरिकेचे बळ मिळणार आहे. ओझर येथील एचएएलच्या कारखान्यात तेजसची निर्मिती होणार आहे. त्यामुळे ओझरमध्येच या इंजिनची निर्मिती होणार असल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय हवाई दलासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा तेजस या लढाऊ विमानांच्या दुसऱ्या पिढीसाठी (एमके२) एफ४१४ हे जेट इंजिन संयुक्त स्वरूपात विकसित करणे ही करारातील प्रमुख तरतूद आहे. ही इंजिन निर्मिती भारतातच करण्याचे प्रस्तावित आहे. तेजस विमानांसाठी जनरल इलेक्ट्रिक किंवा जीई याआधीही इंजिने पुरवत होतीच. ती एफ४०४ या प्रकारातील आहेत. तेजस एमके२ हे मध्यम वजनाचे भारतीय बनावटीचे लढाऊ विमान असून, सध्या हवाई दलाच्या ताफ्यातील जग्वार, मिराज-२००० आणि मिग-२९ या विमानांची जागा ते घेईल, असे नियोजित आहे. प्रवासी आणि लढाऊ विमानांसाठी जेट इंजिनांची निर्मिती करणे ही अत्यंत गुंतागुंतीची आणि खर्चिक प्रक्रिया असते.
केवळ अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांकडेच लढाऊ विमानांसाठी इंजिन बनवण्याची क्षमता आहे. भारताने डीआरडीओच्या माध्यमातून अशा प्रकारची इंजिन्स बनवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, पण अद्याप त्यांना म्हणावे तसे यश आलेले नाही. कावेरी इंजिनाच्या निर्मितीसाठी झालेल्या अक्षम्य विलंबाबद्दल महालेखापरीक्षकांनी डीआरडीओवर ताशेरे ओढले होते. सध्या एफ४१४ हे इंजिन अमेरिकी नौदलाच्या एफ-१८ सुपर हॉर्नेट आणि इलेक्ट्रॉनिक युद्धासाठी वापरल्या जाणाऱ्या ईए-१८ ग्राउलर या विमानांमध्ये वापरले जाते. याशिवाय स्वीडिश कंपनी ग्रिपेनच्या एका प्रकारात वापरले जाते.
प्रत्यक्ष उत्पादन २०२७ मध्ये
संयुक्त निर्मिती म्हणजे एक प्रकारचे तंत्रज्ञान हस्तांतरच असते. अशा प्रकारच्या हस्तांतराविषयी निर्णय घेण्याचा अधिकार अमेरिकी कंपन्यांना नाही. यासाठी अमेरिकी काँग्रेसमध्ये प्रस्ताव सादर होऊन तो मंजूर व्हावा लागेल. केंद्र सरकारच्या संरक्षणविषयक मंत्रिमंडळ समितीने गतवर्षी ऑगस्टमध्ये तेजस – एमके२ प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यासाठी ९ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. २०२४-२५ दरम्यान या विमानाचे प्रारूप (प्रोटोटाइप) विकसित होईल आणि प्रत्यक्ष उत्पादन २०२७मध्ये सुरू होईल, असा अंदाज आहे.