नवी दिल्ली – कोणाच्या आयुष्याला कधी कलाटणी मिळेल, याची शाश्वती नसते. एखाद्याला लॉटरी लागून तो एका झटक्यात श्रीमंत होतो. तर श्रीमंत व्यक्तीला मोठा धक्का लागून तो जमिनीवर येऊ शकतो. अशी एक घटना चीनमध्ये घडली आहे.
चीनमधील लॅरी चेन आधी शाळेत शिक्षक होते. ते ६ महिन्यांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक होते. पण आता त्यांनी अब्जाधीशाचा दर्जाही गमावला आहे. चीन सरकारने तेथील खासगी शिक्षणावर फास आवळला आहे. त्यामुळे लॅरी चेन यांच्या मालमत्तेत ३३६ दशलक्ष डॉलरपर्यंत घट झाली आहे.
ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार, Gaotu Techedu Inc. चे संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लॅरी चेन यांची एकूण संपत्ती आता ३३६ दशलक्ष डॉलर आहे. न्यूयॉर्क ट्रेडिंगमध्ये त्यांच्या ऑनलाइन ट्युटरिंग कंपनीचे शेअर्समध्ये जवळपास दोन तृतीयांश घट झाली आहे. चीनमधील शाळांना निधी जमविण्यासाठी तसेच अभ्यासक्रम सार्वजनिक करण्यापासून रोखण्यासाठी चीन सरकारकडून नवे नियम जारी करण्यात आले आहेत. चेन यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. जानेवारीच्या शेवटी गाओटूच्या स्टॉकमध्ये घट झाल्यानंतर १५ दशलक्ष डॉलरहून मोठा धक्का लागला आहे.
चेन यांनी शनिवारी रात्री उशिरा चिनी सोशल मीडिया विबोवर एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यात ते म्हणाले, गाओटू नियमांचे पालन करेल आणि सामाजिक जबाबदार्यांनाही पूर्ण करेल. या नियमांनंतर संपत्तीत घट झालेले चेन हे एकटे नाहीत. न्ययॉर्कमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये ७१ टक्के घट झाल्यामुळे टीएएल एज्युकेशन ग्रुपचे सीईओ झांग बँग्सिन यांची संपतीसुद्धा २.५ दशलक्ष डॉलरहून घटून १.४ दशलक्ष डॉलरवर आली आहे.
न्यू ओरिएंटल एज्युकेश अँड टेक्नॉलॉजी ग्रुप इंकचे अध्यक्ष यू मिनहोंग यांनीसुद्धा आपला अब्जाधीशांचा मुकूट गमावला आहे. दोन्ही कंपन्यांनी नव्या नियमांचे पालन शपथ घेत निवेदन जारी केले आहेत. गोटू, टीएएल आणि न्यू ओरिएंटलने संपत्तीच्या घट झाल्याचे कारण त्वरित कळविले नाही. चेन यांनी २०१४ मध्ये गाओटू कंपनीची स्थापना केली होती.