इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– किचनमधील वनस्पती –
मेथ्या (मेथी दाणा) fenugreek
सर्वसाधारणपणे आपल्या घरातील किचनमध्ये जे काही मसाल्याचे पदार्थ असतात त्यातीलच एक म्हणजे मेथी. मेथीचे दाणे अतिशय गुणकारी आहेत. आज याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊ….
आपल्या भारतीय स्वयंपाकात मोठ्या प्रमाणावर मेथ्या वापरल्या जातात. आपण जी मेथीची भाजी खातो तिच्या बिया म्हणजेच मेथ्या होय. मेथीचे झुडूप साधारण ३० सेंमी.ऊंच असते.याला ५-६ सेंमी.लांबीची शेंग येते,त्यात १०-१२ बिया असतात त्याच मेथ्या होय. त्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात.
बिया :-
या फिकट पिवळसर रंगाच्या, चपट्या,किंचीत चौकोनी आकाराच्या असतात.स्वयंपाकात फोडणीत वापरतात.
गुण :-
मेथी कडू ,ऊष्ण,तिखट आहे.
उपयोग :-
मेथी भूक वाढवते. पचन सुधारते. पदार्थाला चव आणते.
मेथी वाताला शांत करणारी आहे.कफ पण कमी करते.
मेथी कृमिनाशक आहे.
पोट फुगणे, पोट दुखणे या मध्ये मेथी गुणकारी आहे.
मेथी स्त्रीयांच्या सर्व विकारांत उपयोगी पडते. बाळंतपणात मेथ्यांचे लाडू व खिर देतात.त्यामुळे दूध चांगले येते. बाळंतीणीला कंबरदुखी होत नाही.
खूप जुलाब होत असल्यास मेथ्या भाजून बेदाणे व मीठाबरोबर देतात.
रोज रात्री ७-८ मेथ्या भिजत टाकून सकाळी घ्याव्यात .यामुळे वजन कमी होते.तसेच रक्तातले कोलेस्टेरॅाल,ट्रायग्लीसेराईडस् यांचे वाढलेले प्रमाण कमी होते. मधुमेही लोकांनाही याचा फायदा होतो.
केसांसाठी मेथ्या व कोरफडीचे तेल करतात. कोरफड मध्ये चिरून त्यात मेथ्या टाकून त्यांना मोड आणले जातात . मग या मेथ्या व कोरफड तेलात ऊकळून तेल करतात.
मेथ्यांना मोड आणुन त्याची उसळ करतात.थंडीत ती खूप पौष्टिक असते.
थंडीत मेथ्या खाणे हितकरच असते. डिंकाच्या लाडूत पण मेथ्या घातल्या जातात. ते लाडू खूप खमंग लागतात.
मेथ्यांमध्ये फॅास्फेटस्, लेसिथीन,न्युक्लीओ अलब्यूमीन असते,त्यामुळे ते कॅाडलिव्हर अॅाईलप्रमाणे टॅानीक म्हणून उपयोगी पडते.
लक्षांत ठेवा :-
मेथ्या प्रमांणातच खाव्या ,नाहीतर त्याचेही दुष्परिणाम होतात. त्यामुळे पित्त वाढू शकते. डोकेदुखी, मळमळ, जुलाब ,उलट्या होऊ शकतात. मधुमेही लोकांची साखर एकदम कमी होऊ शकते. त्यामुळं मेथ्या औषध म्हणून वापरतांना वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्याव्या.
मेथी दाणे पाककृती :-
१) मेथ्यांची ऊसळः-
एक छोटी वाटी मेथ्या रात्री भिजत घालाव्या,सकाळी चाळणीत निथळून घेऊन मोड आणण्यासाठी बांधून ठेवाव्या. मोड आल्यावर त्यात थोडे भिजवलेले शेंगादाणे घालावे. तेलाची मोहरी जिरे हिंग कढिपत्ता घालून फोडणी करावी. त्यात मेथ्या ,दाणे चांगले परतून घ्यावेत. मीठ ,चवीला थोडा गूळ घालावा. पाणी घालून मऊ शिजवून घ्यावे. वरून कोथींबीर ,खोबरे किस घालावा. लिंबू पिळावे. पोळी किंवा भाताबरोबर खावी.
मेथी पाक:-
मेथ्या पावडर १ वाटी, सुंठ पावडर १ वाटी, दूध १/२ लिटर , साजूक तूप १ वाटी,६ वाट्या खडीसाखरेची पिठीसाखर ,ओवा ,धने, जिरे,कलौंजी जिरे , बडीशेप,जायफळ, तमालपत्र , दालचिनी ,नागकेशर अर्धा चमचा प्रत्येकी, मीरे पाव चमचा.
कृती :-
मेथी पावडर, सुंठ पावडर , दूध व तूप एकत्र करून ते मंद आचेवर शिजवावे,घट्ट होत आल्यावर त्यात साखर घालून परत शिजवावे. मिश्रण परत घट्ट होऊ लागते. मग गॅस बंद करावा. पातेले खाली घेऊन त्यात ओवा, धने इ. चे बारीक चूर्ण घालावे. चांगले एकजीव करून थंड झाल्यावर चिनीमातीच्या बरणीत भरून ठेवावे.
हिवाळयात तसेच बाळंतपणात रोज १ चमचा खावे. आमवात,संधीवात, अशक्तपणा ,स्रीयांचे रोग यात उपयोगी. बाळंतीणीला २१ दिवस दिल्यास तिला भरपूर दूध येते.
डॉ. नीलिमा हेमंत राजगुरु
आयुर्वेदाचार्य
मो. 9422761801.
ई मेल – drneelimarajguru@gmail.com
fenugreek Methi Ayurved Nutrition Neelima Rajguru