मुंबई – प्राचीन काळापासून जगाच्या इतिहासात गुप्तहेरांच्या उल्लेख आढळतो. भारतातही अनेक राजांच्या दरबारी गुप्तहेर असत. साधारणतः पहिल्या आणि दुसर्या महायुद्धाच्या काळात गुप्तहेरांना विशेष महत्त्वाचे स्थान होते. सहसा जेव्हा हेरगिरीचा विषय येतो तेव्हा पुरुषांची नावे प्रथम येतात. कारण आपल्याला ठाऊक नसते की, हेरगिरीच्या जगात महिला नेहमीच पुढे राहिल्या आहेत. अशाच एका सुंदर महिला गुप्तहेरची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, तिच्या सौंदर्य आणि तीक्ष्ण बुद्धीमुळे तिने हेरगिरीच्या जगावर राज्य केले. माता हारी असे या महिला गुप्तहेरचे नाव आहे.
माता हारी या महिलेने आपल्या काळातील हेरगिरीच्या दुनियेत पुरुषांनाही मागे टाकले होते. जगात जेथे महिला हेरांचा उल्लेख आहे तेथे माता हारीचे नाव सर्वात प्रथम घेतले जाते. माता हारीचा जन्म १८७६ साली नेदरलँड्स येथे झाला होता, परंतु तिचे संगोपन पॅरिसमध्ये झाले.
माता हारीचे खरे नाव गेरत्रुद मार्गारेट झेले होते. ती खुप सुंदर होती. गुप्तहेर होण्याशिवाय एक उत्तम नर्तकी सुद्धा ती होती. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीने माता हारीला पैशाच्या बदल्यात गुप्त माहिती गोळा करण्याची ऑफर दिली होती. त्यामुळे ती जर्मनीची हेर बनली. मात्र ती दुहेरी हेरगिरी करत असल्याचा आरोप तिच्यावर होता.
गुप्त कामगिरीवर स्पेनला जात असताना, माता हारीला इंग्लंडच्या फालमाउथ बंदरावर ब्रिटीश गुप्तचर संस्थेने अटक केली. कारण फ्रान्स आणि ब्रिटनच्या हेरगिरी एजन्सींचा असा संशय होता की, तिने जर्मनीसाठी हेरगिरी केली. मात्र याचा ठोस पुरावा नसतानाही, तिच्यावर डबल एजंट असल्याचा आरोप करून तिला गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
मृत्यूनंतर माता हारीचा मृतदेह पॅरिसमधील वैद्यकीय प्रयोगशाळेत देण्यात आला. तिचे डोके (चेहरा) अॅनाटॉमी संग्रहालयात ठेवण्यात आला होता. परंतु काही वेळाने अचानक ते तिथून अदृश्य झाल्याचा इतिहास आहे. अद्यापही ते सापडू शकलेले नाही.
वास्तविक स्वत: माता हारीने कोणालाही मारले नाही, परंतु तिच्या हेरगिरीने सुमारे ५० हजार फ्रेंच सैनिक मारले गेले अशी नोंद आहे. १९३१ मध्ये या महिला गुप्तहेरच्या आयुष्यावर एक हॉलिवूड चित्रपटही बनविला गेला. त्यामध्ये अभिनेत्री ग्रेटा गरबो मुख्य भूमिकेत होती.