मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भारतासह जगभरातील नागरिक बहुतांश देशात 5G सेवेची दीर्घकाळापासून वाट पाहिली जात आहे. भारतात या वर्षी अखेरपर्यंत 5Gसेवा पूर्णपणे कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. परंतु जगात असे काही देश आहेत, ज्यांमध्ये 6G सेवेवर काम केले जात आहे. त्यापैकी एक दक्षिण कोरिया हा देश आहे. दक्षिण कोरियामध्ये 5G ची सुरुवात झाली आहे. आजपासून तीन वर्षांपूर्वी एप्रिल २०१९ मध्ये दक्षिण कोरियामध्ये 5G सेवा व्यावसायिक स्वरूपात उपलब्ध झाली होती. व्यावसायिक वापराचा अर्थ आहे की, ती काही निवडक क्षेत्रापुरती मर्यादित ठेवण्यात आली नव्हती. दक्षिण कोरिया हा देश व्यावसायिक 5G सेवा मिळणारा पहिला देश ठरला होता. त्यानंतर लगेचच त्यांनी 6G सेवेकडे पाऊल टाकले आहे.
दक्षिण कोरियाचे विज्ञान आणि आयसीटी मंत्री लिम हे-सूक यांनी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये बोलताना सांगितले, की दक्षिण कोरियात २०२८ पासून २०३० पर्यंत 6G सेवा व्यावसायिकरित्या उपलब्ध होणार आहे. म्हणजेच २०२८-३० च्या आधी परीक्षण, मंजुरी आणि अनावरण झाले असेल. दक्षिण कोरियाने 5G कव्हरेज आणि हाय स्पीड नेटवर्कच्या माध्यमातून नव्या डिजिटल तंत्रज्ञानाला वेग देण्याचे काम केले आहे. यामध्ये ब्लॉकचेन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि क्लाउड सारख्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. लिम हे-सूक म्हणालेस, की 6G सेवा सध्याच्या 5G सेवेच्या तुलनेत ५० पटीने वेगात होणार आहे. म्हणजे जर आज 5G वेग १ जीबीपीएस आहे, तर 6Gचा वेग ५० जीबीपीएस असेल. सोबतच 6G नेटवर्कचे कव्हरेज जवळपास १० किमीपर्यंत मिळेल. ते म्हणाले, 6G साठी अमेरिका, फिनलँड आणि इंडोनेशिया सारख्या देशांसोबत द्विपक्षीय चर्चा केली आहे. जेणेकरून 5G, 6G आणि मेटावर्सशी भागीदारी करता येईल.