नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न व औषध प्रशासन विभागाने १८ लाख ३७ हजार ४४ रुपयाचा गुटखा व सिगारेट जप्त करुन धडक कारवाई केली. एफडीएने गेल्या चार-पाच महिन्यांपासून गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू विरोधात धडक मोहीम हाती घेतलेली आहे. त्याचा भाग म्हणून प्रशासनास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १ ऑक्टोंबर रोजी अन्नसुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी आर.के नाशिकरोड या ठिकाणी संशयित गोदामावर छापा टाकला. त्यानंतर गोदामाची तपासणी केली या तपासणीत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला साठा व वैधानिक इशारा नसलेले सिगारेट साठवलेले आढळून आले. हा साठा ३ लाख ६१ हजार ५७० इतका होता. तो जप्त करण्यात आला व गोदामाचा वापर पुन्हा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा होऊ नये म्हणून सील करण्यात आले. त्यानंतर पाटील यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे सोनू लोहिया या रामविलास लोहिया, मनोज लोहिया यांच्या विरोधात फिर्याद दिली.
दुसरीकडे अन्नसुरक्षा अधिकारी गोपाल कासार यांनी लोहिया कंपाउंड शिंदे गाव तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी संशयित दोन गोदामावर गुटखा असल्याच्या संशयावरून धाड टाकली. हे गोदाम उघडले असता त्यामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा साठवलेला आढळून आला. हा साठा १४ लाख ७५ हजार ४७४ इतका होता. तो ताब्यात घेऊन जप्त केला. त्यानंतर दोन्ही गोदाम कासार अन्न सुरक्षा अधिकारी यांनी सिल केले सदर प्रकरणी कासार यांनी अज्ञात इसम गोदामाच्या जागामालक संशयित व्यक्ती रामविलास लोहिया, मनोज लोहिया व पुरवठादार व उत्पादका विरुध्द नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पुढील तपास आता पोलीस करीत आहे. सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त विवेक पाटील, अन्नसुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील, गोपाल कासार, संदीप देवरे, अमित रासकर, योगेश देशमुख वाहन चालक निवृत्ती साबळे यांनी सहआयुक्त अन्न नाशिक विभाग गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.