पुणे – अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने पुणे विभागातील कोल्हापूर, पुणे, सांगली व सोलापूर जिल्ह्यात अन्नपदार्थामध्ये भेसळ केल्याप्रकरणी छापे टाकून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाची धडक मोहिम दिवाळीच्या पार्श्वभुमीवर पुणे जिल्ह्यात ३३ लाख ५१ हजार ७९६ रूपये किंमतीचा साठा व विभागातील इतर जिल्ह्यात २७ लाख ५५ हजार ७२९ रूपये किमतीचा असा एकूण ६१ लाख ७ हजार ५२५ रूपये किमतीच्या अन्न पदार्थांची जप्ती करण्यात आली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक आरोग्य व जनहित विचारात घेत अन्न व औषध प्रशासन विभागामार्फेत मोहिम राबविण्यात आली. पुणे जिल्ह्या खवा, खाद्यतेल, पनीर व इतर अन्न पदार्थाचे एकुण ४६ नमुने तर इतर जिल्ह्यात ४१ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. या मोहिमेदरम्यान २५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान विविध खाद्यपदार्थाचे अन्न नमुने विश्लेषणाकरीता घेण्यात आले. भेसळीच्या संशयावरून विविध अन्न पदार्थाच्या धाडी घालून जप्तीची कारवाई करण्यात आली. पुणे कार्यालयाने खाद्यतेल, खवा, स्वीट खवा, पनीर, व गुळ तसेच इतर अन्नपदार्थ यांचा एकूण ३३ लाख ५१ हजार ७९६ रूपयाचा साठा जप्त करण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यात खवा, खाद्यतेल, दलिया, सुजी, रवा, पोहे, चना डाळ, मिरची पावडर व व्हाईट पावडर, स्किम्ड मिल्क पावडर अन्न पदार्थ यांचा एकूण २१ लाख ७९ हजार ७२९ चा साठा जप्त करण्यात आला. सांगली येथे खाद्यतेलाचा व खवा या पदार्थाचा ४ लाख २६ हजार ५७५ रूपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यात चहा पावडर व इतर अन्नपदार्थ यांचा एकूण १ लाख ५० हजार रूपयाचा साठा जप्त करण्यात आला. नागरिकांना अन्नपदार्थांमध्ये भेसळीबाबत काही संशय आल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1800222365 या संपर्क क्रमांकवावर संपर्क साधावा, असे आवाहन सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी केले आहे.