नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अन्न व औषध प्रशासनाने सिडकोच्या त्रिमुर्ती चौकातील मे. विराज एंटरप्रायजेश या पेढीमध्ये बनावट पनीर व खवा विक्रीसाठी आढळल्यामुळे कारवाई केली. संशयित पनीरचा १२९ किलो ग्रॅम किंमत ३८ हजार ७०० व खवा १८ किलो ग्रॅम किंमत रु. ५ हजार ४० असा एकूण ४३ हजार ७४० रुपयाचा साठा जप्त केला. अन्न व औषध प्रशासनाने या साठयामधून पनीर व खवा या दोन अन्न पदार्थाचे अन्न नमुने विश्लेषणासाठी घेऊन ते प्रयोगशाळेकडे तपासणी पाठविण्यात आले आहे.
जप्त करण्यात आलेला हे संशयित पनीर व खव्याचा साठा हा नाशवंत असल्याने व ते परत खाण्याच्या उपयोगात येवू नये साकरीता त्यावर निळ टाकण्यात येवून सदरचा साठा अन्न व औषध प्रशासनाकडून महानगरपालिकेच्या घंटा गाडीत नष्ट करण्यात आला. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
सदरची कारवाई अन सुरक्षा अधिकारी श्रीमती अश्विनी पाटील, उमेश सूर्यवंशी व अविनाश दाभाडे अन्न सुरक्षा गुप्तवार्ता यांनी मनिष सानप, सहायक आयुक्त, दिनेश तांबोळी, सह आयुक्त (अन) नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाची पथके शहरातील पनीर व खवा उत्पादक व विक्रेते, यांचेवर लक्ष ठेपणार असून कधीही, अन्य कुठेही जाऊन तपासणी करणार आहेत.