नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): अन्न व्यवसाय किंवा खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना अन्न व औषध प्रशासनाचा परवाना/ नोंदणी आवश्यक आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून परवाना किंवा नोंदणी घेतलेली नाही अशा व्यवसायिकांची तपासणी करण्यात येत आहे. अन्न व्यवसायिकाकडे परवाना नसल्यास त्यास रूपये 10 लाख दंड व नोंदणी नसल्यास रूपये 25 हजार दंड अशी शिक्षेची तरतुद आहे. अन्न व खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी अन्न परवाना व नोंदणीसाठी शासनाच्या FOSCOS या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन नाशिक विभागाचे सहआयुक्त (अन्न) म.ना.चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
ज्या अन्न व्यावसायिकांचे वार्षिक उत्पन्न रूपये 12 लाखांपेक्षा कमी आहे त्यांनी नोंदणी घेणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी रूपये 100 इतके शुल्क आहे. तसेच ज्या अन्न व्यावसायिकांचे वार्षिक उत्पन्न रूपये 12 लाखांपेक्षा अधिक आहे त्यांच्यासाठी रूपये 2 हजार इतके शुल्क आहे. परवाने किंवा नोंदणी अर्ज मंजूर झालेल्या व्यावसायिकांना वैयक्तिक मोबाइल क्रमांक किंवा ईमेल मध्ये बदल करावयाचा असल्यास त्यांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे माहिती अद्ययावत करून घ्यावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.