नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात बंदी असलेल्या गुटख्याची राजरोसपणे विक्री होत असल्याची अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईतून पुढे आले आहे. जेलरोड भागात एका पान सुपारी सेंटरवर टाकलेल्या छाप्यात सुमारे अडिच लाख रूपये किमतीची सुगंधी सुपारी आणि पान मसाला पथकाच्या हातील लागला आहे.
या कारवाईत दुकान चालकास अटक करण्यात आली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश गणेश थोरात (४० रा.गणराज चंपानगरी,कॅनोलरोड जेलरोड) असे अटक करण्यात आलेल्या गुटखा विक्रेत्याचे नाव आहे. थोरात याच्या मालकिच्या गजानन पान सुपारी दुकानात राजरोसपणे गुटख्याचा मोठा साठा असल्याची मााहिती एफडीएला मिळाली होती.
त्यानुसार पथकाने पाण्याच्या टाकी भागात धाव घेत कैलासजी सोसायटीतील गाळयावर छापा टाकला असता संशयित गुटख्याची विक्री करतांना आढळून आला. या ठिकाणाहून सुमारे २ लाख ४० हजार ३५९ रूपये किमतीची सुगंधी सुपारी व पान मसाला हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक फुलपगारे करीत आहेत.