नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न व औषध प्रशासनाने अंबड येथील मे. अग्रवाल अॅण्ड कंपनी या पेढीची तपासणी केली असता तेथे मिथ्याछाप सुर्यफुल तेलाची विक्री करत असल्याचे आढळले. परिणामी रिफाईंड सुर्यफुल तेल या अन्नपदार्थाचे दोन अन्न नमुने विश्लेषणासाठी घेवून उर्वरित ७९० लिटरचा साठा किंमत १ लाख २९ हजार ५४८ रुपये किंमतीचा साठा जप्त करुन विक्रेत्याच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे पंचवटी येथील मे.श्री दत्त एंटरप्रायजेस या पेढीची तपासणी केली असता सदर पेढी विनापरवाना अन्नपदार्थाचे उत्पादन करुन विक्री करीत असल्याचे आढळले. परिणामी सदर ठिकाणाहून शाही खीर मसाला, टिक्का मसाला, गरम मसाला (लुज) या अन्नपदार्थाचे तीन अन्न नमुने विश्लेषणासाठी घेवून उर्वरित ३२९० पाकिटे व खुल्या स्वरुपातील गरम मसाला २२ किलोचा साठा एकुण किंमत ६७ हजार ८५० रुपये किंमतीचा साठा जप्त करुन विक्रेत्याच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे
हे सर्व अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल आज रोजी प्रलंबित आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधितावर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार पुढील कारवाई घेण्यात येईल. सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी एस.डी. तोरणे, जी.एम. गायकवाड, अ.उ.रासकर, एस.जी. मंडलिक यांनी म. मो. सानप, सहायक आयुक्त (अन्न) यांच्या उपस्थित व म.ना. चौधरी, सहआयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनात केली.