नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न व औषध प्रशासनाकडून दिवाळी मोहिममध्ये ६४ हजार ७४७ किंमतीचा संशयित खाद्य तेलाचा साठा जप्त केला. सध्या दिवाळी सण येणार असल्याने या सणांमध्ये खाद्य तेलास प्रचंड मागणी असते. ही बाव लक्षात घेऊन नागरिकांना दर्जेदार, सकस खाद्यतेल मिळावे यासाठी एफडीएने आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एफडीएची पथके शहरातील खाद्यतेल विक्रेते, रिपॅकर विक्रेते, यांचेवर लक्ष ठेवणार असून कधीही अन कुठेही जाऊन तपासणी करणार आहेत.
अन्न सुरक्षा व मानके कायदा, नियमानुसार निर्गमित करण्यात आलेल्या परवाना अटींचे उल्लंघन होता कामा नये, अन्नविषबाधासारखा अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी अन्न व औषध प्रशासन तत्पर असून २४ ऑक्टोंबर रोजी मे. श्री आदिनाथ ट्रेडींग कंपनी पंचवटी, नाशिक या पेढीची तपासणी केली असता तेथे जुन्या वापरलेल्या डब्यात रिफाईंड सोयाबीन तेल भरुन विक्री करत असल्याचे आढळले. परिणामी रिफाईंड सोयाबीन तेल या अन्नपदार्थाचा अन्न नमुना घेवून उर्वरित ३८८ कि.ग्रॅ. साठा किंमत ६४ हजार ७४७ रुपये किंमतीचा साठा जप्त करुन विक्रेत्याच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे.
सदरचा अन्न नमुना विश्लेषणासाठी पाठविण्यात आला असून विश्लेषण अहवाल आज रोजी प्रलंबित आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधितावर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार पुढील कारवाई घेण्यात येईल. सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार, अमित रासकर यांनी डी.डी. तांबोळी, सहायक आयुक्त (अन्न) यांच्या उपस्थित व म.ना. चौधरी, सहआयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनात केली.