मुंबई – चीनमध्ये आश्चर्यकारक घटना घडण्याचे प्रमाण काही कमी नाही. अलीकडेच एका बापाला त्याचा मुलगा हरविल्यानंतर २४ वर्षांनी सापडला आहे. त्यामुळे ही घटना जगभरात चर्चेला येत आहे. आपल्या मुलाला शोधण्यासाठी या बापाने जगभरात ५ लाख किलोमीटरपर्यंतचा प्रवास केला. अखेर त्यांना २६ वर्षाचा मुलगा भेटला.
अवघ्या दोन वर्षांचा असताना मुलाचे अपहरण झाले. गुए गँगटन असे बापाचे नाव असून त्याच्या मुलाच्या गायब होण्यावर २०१५ मध्ये एक चित्रपटही आला होता. चीनमध्ये मुलांच्या अपहरणाची मोठी समस्या आहेत. दरवर्षी हजारो मुलांचे अपहरण होत असते. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, डीएनए चाचणीद्वारे गुए गँगटनच्या मुलाची ओळख पटविण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटकही केली आहे. त्यांचा मुलगा शिक्षक असून तो आरोपींमध्ये एक पुरुष व एक महिला आहे. दोघेही १९९७ च्या कालावधीत डेटींग करीत होते. त्यावेळी त्यांनी या दोन वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याला विकण्याचा प्लॅन केला होता. त्याला घेऊन के हॅनन प्रांतात गेले. तिथे त्यांनी मुलाला विकले. त्यानंतर गुए गँगटनने बाईकवरून २० प्रांतांमध्ये मुलाचा शोध घेतला.
यादरम्यान त्यांचा बरेचदा अपघात झाला. त्यात हाडांना मार लागला. काही ठिकाणी त्यांना चोरांनी लुटले सुद्धा. गँगटनने आपल्या मुलाच्या फोटोचे बॅनर तयार केले होते. या शोधात ते कुठेही राहायचे, मिळेल ते खायचे. यात अपहरण झालेल्या पाल्यांच्या पालकांची एक संघटना त्यांना मिळाली. त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मदत केली. चीनमधील बालकांची तस्करी ही मोठी समस्या या काळात त्यांना कळली. सामाजिक कार्य त्यांच्या हातून झाले. पण मुलाच्या भेटीसाठी २४ वर्षे वाट बघावी लागली. चीनमध्ये दरवर्षी २० हजार मुलांचे अपहरण होते, असे सांगितले जाते. यात बहुतांश मुलांना विकले जाते.