इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मोबाईल फोनचे जनक मार्टिन कूपर यांनी आपल्या मोबाईल संशोधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. जगभरात लोकं गरजेपेक्षा जास्त प्रमाणात मोबाईल वापरत आहेत हे पाहून वाईट वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. लोकांनी आपले प्राधान्यक्रम निश्चित करण्याची वेळ आली आहे असेही ९३ वर्षीय कूपर म्हणाले आहे.
एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात मोबाईल वापरामध्ये किती जास्त वेळ आपण खर्च करतो यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. जागतिक स्तरावर लोकं दररोज साधारणपणे ४.८ तास फोनमध्ये घालवतात. या यादीत भारत जगात चीननंतर दुसऱ्या स्थानावर आहे. मागील वर्षी भारतीयांनी ६९.९ कोटी तास मोबाईलवर घालवले आहे. रोज सरासरी ४.७ तास वेळ मोबाईलवर भारतात घालवला जातो.
१९७०च्या दशकात मार्टिन हे पहिला मोबाईल फोन बनवणाऱ्या मोटोरोला टीमचे पर्यवेक्षक होते. १९७३मध्ये सार्वजनिक ठिकाणी पोर्टेबल मोबाईल फोन वापरणारे ते पहिले व्यक्तीदेखील होते. मार्टिन यांनी ३ एप्रिल १९७३ रोजी जगातील पहिला मोबाईल कॉल केला होता. हा मोबाईल बनवण्यासाठी त्यांना आणि त्यांच्या टीमला ३ महिने लागले होते. या फोनची बॅटरी २५ मिनिटांपर्यंत चालायची आणि चार्ज करण्यासाठी १० तासांचा वेळ द्यावा लागायचा. १० इंच लांब व अडीच पौंड वजनी होता. याशिवाय प्रत्येकाला वेगवेगळे क्रमांक देण्याची कल्पनाही मार्टिन यांची होती.
मोबाईल वापराबाबत झालेल्या सर्वेक्षणांमध्ये ७२ टक्के लोकं सकाळी उठल्यावर पहिल्यांदा मोबाईलवर मेसेज, नोटिफिकेशन बघतात. ५६ टक्के लोकांना फोन जवळ नसल्यावर एकटे व उदास वाटते. ५४ टक्के लोकांनी मान्य केले आहे की ते मोबाईलवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवतात. ४३.५ टक्के लोकं दिवसातून कमीतकमी ५० ते १०० वेळा अनलॉक करतात. इतकेच काय तर ७३.४ टक्के लोकं टॉयलेटमध्येही फोन घेऊन जातात.
Father Of Mobile Phone Martin Cooper Says