मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या विधीमंडळात अनोखा योगायोग पहायला मिळाला आहे. खरं तर आज एक विक्रमच घडला आहे. भाजप आमदार राहुल नार्वेकर यांची आज विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांना एकूण १६४ मते मिळाली. म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्यापेक्षा त्यांना ५० पेक्षा अधिक मते मिळाली आहेत. राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई आहेत. त्यामुळे सासरे विधान परिषदेचे सभापती आणि जावई विधानसभेचे अध्यक्ष असा अनोखा योगायोग विधीमंडळात बघायला मिळत आहे.
विधानसभेचे विशेष अधिवेशन आज सकाळी ११ सुरू झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला उद्या बहुमत चाचणीला सामोरे जायचेच आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यावरून शिंदे हे सभागृहाचा विश्वास सहज जिंकतील असे स्पष्ट होत आहे. मात्र, शिंदेंचा गट भाजपमध्ये विलीन होणार की शिवसेनेवर आपली सत्ता प्रस्थापित करणार याबाबत साशंकता आहे.
आज निवड झालेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविषयी काही बाबी जाणून घेणे आवश्यक आहे. आजवरच्या अध्यक्षांमध्ये सर्वात तरुण अशी त्यांची नोंद झाली आहे. त्यांचे वय ४५ वर्षे एवढे आहे. मुंबईतील कुलाबा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. यापूर्वी ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. नार्वेकर हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई आहेत. रामराजे हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. नार्वेकर यांनी २०१४ मध्ये शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. त्यावेळी ते शिवसेनेच्या युवा शाखेचे प्रवक्ते होते. शिवसेनेतून त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नार्वेकर यांनी मावळमधून २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा शिवसेनेच्या श्रीरंग आप्पा बारणे यांच्याकडून पराभव झाला होता. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नार्वेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कुलाब्यातून त्यांनी काँग्रेसचे अशोक जगताप यांचा पराभव करून विधानसभा निवडणूक जिंकली. आणि आता ते विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत.
https://twitter.com/MahaDGIPR/status/1543485624220786688?s=20&t=UePRHnJX657f9r6QbMEy6g
Father in Law and Daughter in law interesting Maharashtra Assembly Politics Rahul Narvekar Ramraje Naik Nimbalkar