नाशिक- इंदिरानगर येथील पांडवनगरीत राहणाऱ्या शौर्य लाखोडे याच्या कपड्यांनी फटाक्यामुळे पेट घेतल्यामुळे तो भाजला. अचानक एका मित्राने फटाका पेटवून बाजूला फेकला व तो नेमका शौर्यच्या अंगावर पडला. त्यामुळे त्याच्या कपड्यांनी पेट घेतला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शौर्यच्या आईने फटाके विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी केली आहे.
या घटनेमुळे पुन्हा फटाके बंदी वरही चर्चा होई लागली आहे. राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ योजनेअंतर्गत वायू प्रदूषण रोखण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुढाकार घेऊन नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात दिवाळीत फटाके विक्री करण्यावर बंदी घातली होती. विशेष सभा घेऊन फटाके बंदीबाबत आपआपल्या विभागांना तात्काळ निर्णय घेण्याचे आदेशही गमे यांनी दिले होते. ऐन दिवाळीच्या तोंडावर हा निर्णय झाल्याने फटाके विक्रेते नाराज झाले होते. शेवटी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. पण, इंदिरानगरच्या घटनेने पुन्हा त्यावर चर्चा होऊ लागली आहे.
सरकारने फटाके विक्रीवर बंदी आणायची गरज
शौर्य त्याच्या मित्रासोबत फटाके फोडत होता. यावेळी एका मित्राने फटाका पेटवला आणि तो दूर फेकला. नेमका तो फटका माझ्या लेकराच्या अंगावर पडला. यात तो भाजला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. खरे तर सरकारने फटाके विक्रीवर बंदी आणायची गरज आहे.
– योगिता लाखोडे, जखमी शौर्यची आई