इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ( एनएचएआय) देशभरातील महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरील सुमारे ११५० टोल प्लाझांवर १५ ऑगस्ट पासून फास्टॅग वार्षिक पास सुविधा यशस्वीरित्या लागू केली. तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नागरिकांचे जीवनमान सुलभ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांनी या वार्षिक पासला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. ही सुविधा लागू झाल्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत, सुमारे १.४ लाख वापरकर्त्यांनी वार्षिक पास खरेदी केला, आणि तो वापरायला सुरवात केली. टोल प्लाझांवर सुमारे १.३९ लाख व्यवहार नोंदवले गेले. एकाच वेळी सुमारे २० ते २५ हजार वापरकर्ते राजमार्गयात्रा ॲपचाही वापर करत आहेत, आणि वार्षिक पास वापरकर्त्यांना टोल शुल्क शून्य कापल्याचे ‘एसएमएस’व्दारे माहिती दिली जात आहे.
फास्टॅग वार्षिक पास सुविधा वैध फास्टॅग असलेल्या सर्व बिगर व्यावसायिक वाहनांसाठी लागू आहे. राजमार्गयात्रा ॲप किंवा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून एकदा शुल्क भरल्यावर दोन तासांच्या आत हा पास वापरासाठी उपलब्ध होतो.
देशातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणालीमध्ये क्रांती घडवणार्या फास्टॅग सुविधेचा वापराचा दर ९८ टक्के असून, फास्टॅगच्या वापरकर्त्यांची संख्या ८ कोटींपेक्षा जास्त आहे. आहे. वार्षिक पास सुविधेमुळे फास्टॅग वापरकर्त्यांचा अनुभवचा अधिक समृद्ध होईल, त्याच बरोबरीने राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरील प्रवास अधिक किफायतशीर आणि सुलभ होणार आहे.