नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फास्टॅग वापरापूर्वी 60 मिनिटे आणि वापरानंतर 10 मिनिटे सुरू नसेल (ऍक्टीव्ह) तर त्यावरील व्यवहार नाकारले जात असल्याच्या नियमातील बदलासंदर्भात काही प्रकाशनांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांसंदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) असे स्पष्टीकरण देत आहे की 28.01.2025 रोजी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून जारी करण्यात आलेले परिपत्रक क्रमांक NPCI/2024-25/NETC/004A चा कोणताही परिणाम फास्टॅग ग्राहकांच्या वापराच्या अनुभवावर होणार नाही.
वाहन टोल प्लाझा ओलांडते त्यावेळी फास्टॅगमधून पैसे प्राप्त करणारी आणि त्यामध्ये पैशांचा भरणा करणारी बँक यामधील विवाद सोडवण्याच्या उद्देशाने, एनपीसीएलकडून हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. फास्टॅग व्यवहार टोल प्लाझावरून वाहन जात असताना योग्य त्या वेळेत पूर्ण व्हावेत, जेणेकरून व्यवहार उशिरा झाल्यामुळे ग्राहकांना त्रास दिला जाणार नाही, हा देखील या परिपत्रकाचा उद्देश आहे. राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल प्लाझा आयसीडी 2.5 प्रोटोकॉलनुसार चालवले जातात, ज्यामध्ये रियल टाईम टॅग स्टेटस दिले जाते, त्यामुळेच फास्टॅग ग्राहक टोल प्लाझा ओलांडण्यापूर्वी वेळेवर रिचार्ज करू शकतील.
राज्य महामार्गावरील काही टोल प्लाझा अद्यापही आयसीडी 2.4 प्रोटोकॉलवर आहेत, ज्यांचे नियमितपणे अद्यतनीतकरण करण्याची गरज असते. असे सर्व टोल प्लाझा लवकरच आयसीडी 2.5 मध्ये स्थानांतरित करण्याचे नियोजित आहे.
मॅन्युअल रिचार्जची पद्धत टाळण्यासाठी फास्टॅग वॉलेट यूपीआय/करंट/सेव्हिंग्ज अकाऊंटशी ऑटो रिचार्ज अंतर्गत जोडण्यासाठी फास्टॅग ग्राहकांना प्रोत्साहन दिले जात आहे. टोल प्लाझावर पोहोचण्यापूर्वी ग्राहकांना त्यांचे फास्टॅग यूपीआय, बँकिंग किंवा इतर अनेक पर्यायांच्या माध्यमातून कोणत्याही वेळी रिचार्ज करण्याची प्रक्रिया यापुढेही सुरू ठेवता येणार आहे.