जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासगी सावकारीच्या पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्यात प्रथमच १५ शेतकऱ्यांना त्यांची तब्बल १०० एकर जमीन परत मिळाली आहे. आपली जमीन परत मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. तसेच, ही वार्ता सध्या संपूर्ण राज्यातच विशेष चर्चिली जात आहे.
मागील वर्षी उपनिबंधक कार्यालयाने धाडी घातल्यावर आठ सावकारांच्या घरातून जप्त केलेल्या दस्ताच्या माध्यमातून १५ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनी परत मिळवून देण्यात यश आले आहे. जमिनी परत मिळताच शेतकऱ्यांमध्ये आनंद निर्माण झाला असून, त्यांना अश्रूही अनावर झाल्याचे दिसून आले.
जिल्ह्यातील सावदा तालुक्यातील नंदकुमार मुकुंदा पाटील याने सात जणांच्या मदतीने १०० एकर जमीन लाटल्याचा प्रकार घडला होता. १९९६ ते २००९ या कालावधीत रोखीने व्यवहार करीत या जमिनींवर या टोळक्याने कब्जा मिळविला होता. नंदकुमार मुकुंदा पाटील, मुरलीधर सुदाम राणे, मुरलीधर तोताराम भोळे, मधुकर तुकाराम राणे, मुरलीधर काशीनाथ राणे, सुदाम तुकाराम राणे, श्रीधर गोपाळ पाटील, मधुकर वामन चौधरी, अशी या सावकारांची नावे आहेत. त्यांनी १५ शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या होत्या. या जमिनी अवैध सावकारीतून बळकावल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते.
जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी संबंधित शेतकऱ्यांनी या जमिनींचा ताबा घ्यावा, अशा आशयाचे आदेशपत्र प्रदान केले आहे. सावकारांच्या कब्जातून १०० एकर जमीन पीडितांना परत केल्याची ही राज्यातील पहिलीच कारवाई आहे. या जमिनी परत मिळताच शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांच्याकडून उपनिबंधक कार्यालयाचे आभार मानण्यात आले.
Farmers get Own Land from Lender State First Action
Agriculture