नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतीच्या बांधावरुन झालेल्या मारहाण प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने आरोपीला सहा महिने सक्त मजुरी आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठोठावलेली शिक्षा जिल्हा न्यायालयाने कायम केली आहे.
सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ११ ऑगस्ट २००७ रोजी हा गुन्हा घडला होता. शेताचे बांधावरून झालेल्या वादातून मारूती बन्सी बिन्नर (रा. हिवरे, ता. सिन्नर) आणि इतरांनी रामनाथ सदगीर यांना मारहाण केली. त्यानंतर सदगीर यांनी बिन्नर विरोधात तक्रार दिली. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात या खटल्याचे कामकाज चालले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपी मारूती बिन्नर यास आयपीसी कलम ३२४ अन्वये सहा महिन्यांसाठी सक्त मजुरीची शिक्षा व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. या शिक्षेविरोधात आरोपी बिन्नर याने जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले. या अपिलाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. उमेशचंद्र मोरे यांच्या कोर्टात झाली. न्यायालयाने हे अपील फेटाळून लावले. तसेच, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ठोठावलेली शिक्षा कायम केली.
मा.जिल्हा व सत्र न्यायालयाने सदर निकाल देतांना केसमधील पुराव्यांची मिमांसा व ऊहापोह तर केलाच. पण त्यासोबत केवळ शेताच्या बांधाच्या कारणांवरून होणाऱ्या वाद व वैमनस्याबाबत देखील चिंता व्यक्त केली. याबाबत आपले निरीक्षण नोंदविताना न्यायालयाने नमूद केले आहे की, अशा क्षुल्लक कारणावरून दोन शेजाऱ्यांचे संबंध बिघडून त्या़ंच्यात अकारण शत्रूत्व निर्माण होते. ते पुढच्या पिढीपर्यंत चालते. याबाबत दोन्ही पक्षांनी समजुतीने सदर वाद हा न्यायालयात भांडण्यापेक्षा वैकल्पिक वाद निवारण केंद्राचे मदतीने मिटविला तर सर्वांचे संबध सलोख्याचे राहतील. हे मी वडिलकीच्या नात्याने सूचवित असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या कारणांमुळे दाखल होणाऱ्या केसेसचे प्रमाण वाढल्याबद्दल न्यायमूर्ती मोरे यांनी चिंता व्यक्त केली. सदगीर यांच्यावतीने सरकारी वकिल शिरीष जी. कडवे यांनी काम पाहिले.
Farmers Dispute Fight Nashik Court Hearing Sentence
Crime Legal