अहिल्यानगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा संकटांना शेतकऱ्यांनी धैर्याने सामोरे जावे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पुढील दहा दिवसांत संपूर्ण पंचनामे पूर्ण करून दिवाळीपूर्वी मदतनिधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेती क्षेत्र, पिके, फळबागा, पशुधन व घरे यांचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचेही त्यांनी सांगितले.
शेवगाव तालुक्यातील भगूर व पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावांतील अतिवृष्टीग्रस्त भागाची कृषीमंत्री भरणे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी आस्थेवाईक संवाद साधून त्यांना दिलासा दिला.
कृषीमंत्री भरणे म्हणाले, “जिल्ह्यात आतापर्यंत ७ लाख ४९ हजार एकर शेती क्षेत्राचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यापैकी मागील एका महिन्यातच ६ लाख ३४ हजार एकर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांचे एक गुंठाही क्षेत्र पंचनाम्यापासून सुटणार नाही. एनडीआरएफ व एसडीआरएफच्या निकषांनुसार शासन शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यासाठी कटिबद्ध आहे.”
या नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी ई-पीक पाहणीस मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पीक विमा कंपन्यांना तातडीने मदत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांचे शेत, घर किंवा घरावरील छत वाहून गेले आहे, अशा शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनामार्फत गृहोपयोगी साहित्य, किराणा व आवश्यक तातडीची मदत पुरविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
कृषीमंत्री श्री.भरणे पुढे म्हणाले, “नैसर्गिक संकटाचा सामना करताना ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमणाबाबत शासन गंभीर आहे. अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात येईल.”
या दौऱ्यात आमदार मोनिकाताई राजळे, आमदार शिवाजीराव कर्डीले, आमदार संग्राम जगताप, शेवगाव तहसीलदार आकाश दाभाडे, पाथर्डी तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधारक बोराळे, श्रीरामपूर उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड, महादेव लोंढे यांच्यासह महसूल, वन, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.