मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे. येत्या 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्तांकडून सर्व बँकांना देण्यात आल्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य दिलीप मोहिते पाटील, बाळासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर, डॉ.देवराव होळी, वैभव नाईक यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना आणि प्रोत्साहन अनुदान देण्याबाबतची सद्यस्थिती याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.
श्री.सावे म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या 12 लाख 84 हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत 4683.2 कोटी रुपये 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने थेट वितरित करण्यात आले आहेत. तर उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर लाभ देण्याची कार्यवाही सुरु असून 2 लाख 82 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी 1,014 कोटी रुपयांची पुरवणी मागणी करण्यात आली आहे. तसेच ही कार्यवाही 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त स्तरावरुन सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 32 लाख 3 हजार शेतकऱ्यांना 20,425.12 कोटी रुपये वितरित करण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु असल्याचेही श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.
#विधानसभालक्षवेधी
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रु. प्रोत्साहनपर लाभ येत्या ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना देण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांकडून बँकांना देण्यात आल्या आहेत-मंत्री @save_atul— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 14, 2023
Farmers 50 Thousand Help Cooperative Minister Assembly