नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुरगाणा तालुक्यात महसूल, वन व आदिवासी विभाग यांच्यासह अन्य विभागांनी सर्व प्रलंबित कामे येत्या 15 दिवसांत तत्काळ पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिल्या आहेत.
आज जिल्हाधिकारी यांनी सुरगाणा तालुक्यात शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. याबैठकीस उपवनसंरक्षक पंकज गर्ग, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा कळवण उपविभागीय अधिकारी विशाल नरवाडे, तहसीलदार सचिन मुळीक, गट विकास अधिकारी दिपक पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सुरगाणा तालुक्यातील कामांचा आढावा घेतांना सांगितले की, पुरवठा विभागाने रेशन कार्ड बाबत असलेल्या सर्व ऑनलाईन नोंदी तातडीने पूर्ण कराव्यात. तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी समन्वयाने शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या अनुषंगाने तालुक्यात 3 शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. तसेच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई व शबरी या योजनांमधील नवीन प्रस्ताव मंजूर करून मंजूर असलेल्या प्रस्तावांच्या हफ्त्यांचे वितरण करावे. मुख्यमंत्री सौर ऊर्जा अंतर्गत पथदर्शी प्रकल्प म्हणून 5 प्रस्ताव सादर करण्यात यावेत. त्याचप्रमाणे कानाशी येथे कळवण उपविभागीय अधिकारी यांच्या मदतीने सबस्टेशन सुरू करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जलजीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण करून प्रत्येकाला पाणी उपलब्ध होईल यासाठी पाणी पुरवठा विभागाने योग्य ते नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे जलजीवन मिशन अंतर्गत अंबोडे गावात वन जमिनीमध्ये विहीर पंप बसविण्यात येऊन ज्या गावांमध्ये जल जीवन मिशनच्या कामांसाठी वन विभागाची परवानगी आवश्यक आहे त्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या समन्वयाने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने योग्यती कार्यवाही करावी. उमेद अभियानाचे व्यवस्थापक यांनी सुरगाणा तालुक्यातील प्रत्येक गावात किमान 5 महिला बचत स्थापन करुन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती केंद्राच्या माध्यमातून सुरगाणा तालुक्यातील बँकेत प्रस्ताव सादर करावेत. तसेच स्मशानभूमी नसलेल्या गावांचे परिपूर्ण अंदाजपत्रकांसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात यावे. वन विभागाने बेकायदेशीररीत्या वृक्षतोड करणारे व वन जमिनीवर अतिक्रमण करणारे यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे कृषी विभागामार्फत सुरू असणाऱ्या योजनांचा लाभ तालुक्यातील प्रत्येकापर्यंत पोहचेल यादृष्टीने प्रयत्नपूर्वक कार्यवाही करण्यात यावी. तसेच प्रत्येक विभागाने केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल सादर करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी यावेळी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या.
बैठकीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी वनहक्क कायद्यासाठी दावेदारांची मागणी जाणून घेवून गावपातळीवरील ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण, वनहक्क समित्यांचे कामकाज, शासनाच्या काही योजनांच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी सुरगाणा तालुक्यातील विविध भागांना भेटी दिल्या.
Farmer Long March Nashik Collector Surgana Issues Meet