सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज सकाळच्या सुमारास नांदूरशिंगोटे येथे बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव सोमनाथ महादू मेंगाळ (वय 45 वर्षे) असे आहे. मेंगाळ हे एकलव्य नगरमधील आदिवासी वस्तीवर राहतात.
स्थानिक शेतकऱ्यांनी आणि मेंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास मेंगाळ हे वस्ती जवळील विहिरीकडे जात होते. त्याचवेळी रस्त्याच्याकडेला असलेल्या बिबट्याने मेंगाळ यांच्यावर हल्ला चढविला. मात्र, मोठ्या ताकदीनिशी मेंगाळ यांनी बिबट्याचा हल्ला परतवून लावला. त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. मात्र या हल्ल्यात मेंगाळ हे जखमी झाले आहेत. या हल्ल्यात मेंगाळ हे जखमी झाले आहेत. त्यांच्या पोटावर, डाव्या हातावर आणि डाव्या पायावर जखमा झाल्या आहेत. दोडी बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
मेंगाळ यांनी सांगितले की, रस्त्याच्या कडेला दबा धरुन दोन बिबटे बसले होते. त्यातील एकाने माझ्यावर हल्ला केला. मी जोरदार प्रतिकार केल्याने दोन्ही बिबट्यांनी पळ काढला. एक बिबट्या डोंगराकडे तर दुसरा सोमनाथ शेळके यांच्या मक्याच्या शेतात पळून गेला. दरम्यान, हल्ला झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. तसेच, तातडीने यासंदर्भात पोलिस, वन आणि स्थानिक प्रशासनाला कळविले. परिसरातील बिबट्यांचा वावर लक्षात घेता तातडीने पिंजरा लावावा आणि बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.