पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकीकडे मुलगी झाली म्हणून दुःखी होणाऱ्यांची संख्या आजही मोठी असताना, पुण्यात नवजात नातीच्या स्वागतासाठी चक्क हेलिकॉप्टर बुक केल्याचं दिसून आलं. हेलिकॉप्टरमधून नात आणि सुनेला घरी आणण्यात आलं. या जंगी स्वागताची सध्या देशभरात चर्चा होत आहे. शेतकरी आजोबांनी सून आणि नातीसाठी घेतलेला हा पुढाकार सर्वांसाठीच आदर्श ठरला आहे.
हल्लीच्या काळात स्त्री – पुरुष समानतेविषयी कितीही भरभरुन बोललं जात असलं तरी अनेकांना आजही घरात मुलाचाच जन्म व्हावा असं वाटत असतं. घरात मुलगी जन्माला आली तर अनेकजण नाक मुरडतात. पुण्यात मात्र याबाबत अतिशय सुखद प्रसंग बघायला मिळाला. बालेवाडी परिसरात राहणाऱ्या अजित पांडुरंग बालवडकर यांनी आपल्या नातीला आणि सुनेला हेलिकॉप्टरमधून घरी आणत त्याचं स्वागत केलं. ते म्हणाले की, मला माझ्या नातीचं भव्य स्वागत करायचं होतं. म्हणून हेलिकॉप्टर बुक करुन नात आणि सुनेला मी घरी आणलं. नवजात बाळाला आईसोबत घरी आणण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी त्यासाठी हेलिकॉप्टर बुक केले. एएनआय या वृत्तसंस्थेनेदेखील याविषयी माहिती दिली आहे. बालेवाडी येथील शेतकरी अजित पांडुरंग बालवडकर यांनी आपल्या नवजात नातवाला आणि सुनेला पुण्यातील शेवाळवाडी येथील आपल्या सुनेच्या माहेरून बालेवाडीला आणण्यासाठी हेलिकॉप्टर भाड्याने घेतल्याचं या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. कुटुंबीयांनी नवजात बाळाचे नाव कृशिका ठेवले आहे.
हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी बालवडकर यांनी आधी हेलिपॅड तयार केले. बालेवाडीत पाटील वस्ती म्हणून जागा आहे तिथे हे हेलिपॅड बनवण्यात आले असून या जागेवर हेलिकॉप्टर उतरतवण्यात आले. तेथून पुढे वाजत – गाजत, फुलांनी सजवलेल्या कारमध्ये, फुलांची उधळण करत बाळाला घरी आणण्यात आले. या प्रसंगांना व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून बालवडकरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नातीच्या जन्माचा इतका आनंद पाहून सोशल मीडिया युझर्सनेही आनंदी प्रतिक्रिया देत शुभेच्छा दिल्या. या स्वागताबरोबरच बालवडकरांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ असा संदेशही समाजाला दिला आहे.