नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत कृषी पर्यटन धोरणांतर्गत कृषी पर्यटन केंद्रांसाठी नोंदणीला सुरवात करण्यात आली आहे. इच्छुकांनी नोंदणी करावी, असे आवाहन पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई- राठोड यांनी केले आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या कृषी पर्यटन धोरणानुसार ऑनलाइन नोंदणी अर्ज पर्यटन विभागाच्या www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कृषी पर्यटन धोरणांतर्गत नोंदणीसाठी किमान एक एकर शेती क्षेत्र असणारे वैयक्तिक शेतकरी, कृषी सहकारी संस्था, शासन मान्यता प्राप्त कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालये, विद्यापीठ किंवा शेतकऱ्यांनी स्थापन केलेली भागिदार संस्था या धोरणांतर्गत नोंदणी करू शकतात.
नोंदणी शुल्क पाच वर्षांसाठी अडीच हजार रुपये आहे. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे अशी : अर्जदाराच्या जमिनीची कागदपत्रे (सातबारा उतारा, 8 अ), आधार व पॅन कार्ड, वीज बिल, ऑनलाइन पद्धतीने www.gras.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर अडीच हजार रुपये नोंदणी शुल्क भरुन त्या चलनाची प्रत, अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत परवाना.
कृषी पर्यटन धोरण नोंदणीचे फायदे असे
शेतीला पूरक व्यवसाय, रोजगाराचे नवीन साधन, पर्यटन विभागातर्फे नोंदणी प्रमाणपत्र, नोंदणीकृत पर्यटन केंद्रास पर्यटन धोरणांतर्गत प्रोत्साहन उदा. वस्तू व सेवाकर, विद्युत शुल्काचा लाभ घेता येईल. शेततळे योजनेकरीता प्राधान्य, ग्रीन हाऊस, फळबाग, भाजीपाला लागवड सारख्या योजनांचे लाभ घेता येतील. घरगुती गॅस जोडणी वापरता येईल. शासनाकडून अनुभवी प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण देण्यात येईल. पर्यटन संचालनालयामार्फत कृषी पर्यटन केंद्राची प्रसिध्दी करण्यात येईल. मार्केटिंगसाठी पर्यटन विभागाकडून मार्गदर्शन, आठ खोल्यांपर्यंतच्या केंद्रासाठी खोल्यांच्या बांधकामासाठी नगररचना विभागाच्या परवानगीची आवश्यकता नाही.
नोंदणीसंदर्भात अधिक माहितीसाठी संपर्काचा पत्ता असा : पर्यटन संचालनालय, उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ क्लब मैदान, नाशिक, दूरध्वनी क्रमांक : 0253- 2570059,2579352 ईमेल आय.डी ddtouism.nashik-mh@gov.in, संकेतस्थळ-www.Maharashtratourism.gov.in असा आहे.