इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दुष्काळ, अतिवृष्टीसारख्या संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत असतानाच, शेतमालाच्या किमतीत सतत चढ-उतार होण्याचे आव्हानदेखील पेलावे लागत आहे. मालाला भाव न मिळणे ही शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी समस्या आहे. याच निगडीत एक उदाहरण समोर आले आहे. कर्नाटकमधील एका शेतकऱ्याने तब्बल २०५ किलो कांदे विकूनही त्याच्याकडे फक्त ८ रुपये शिल्लक राहिल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे. सध्या या प्रकाराची जोरदार चर्चा रंगली आहे.
कर्नाटकमधील गडगमधील पावडेप्पा हल्लीकेरी नावाच्या शेतकऱ्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला. त्याने बंगळुरूच्या यशवंतपूर येथील बाजारात २०५ किलो कांद्याची विक्री करण्यासाठी तब्बल ४१५ किलोमीटरचा प्रवास केला. मात्र एवढा कांदा विकून देखील शेतकऱ्याच्या हातात शेवटी फक्त ८.३६ रुपये शिल्लक राहिले. शेतकऱ्याला पैसे मिळाल्याच्या पावतीचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. शेतकऱ्याच्या कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये भाव मिळाला. त्यात मालवाहतुकीचे ३७७ रुपये कापण्यात आले. त्यानंतर हमालीचे २५ रुपये कापण्यात आले. शेवटी शेतकऱ्याच्या हातात फक्त ८.३६ रुपये शिल्लक राहिले.
शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. याच कारणामुळे येथील शेतकरी सरकारविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. या शेतकऱ्यांकडून हमीभावाची मागणी केली जात आहेत. पावडेप्पा हल्लीकेरी यांनी पुणे, तामिळनाडूमधून अनेक शेतकरी हे आपला माल यशवंतपूर येथे घेऊन येतात. येथे मालाला चांगली किंमत मिळते. पण आम्ही इतक्या कमी किमतीची आशा केली नव्हती. मला फक्त आठ रुपये मिळाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. इतर शेतकरी यशवंतपूर बाजारातील या गोष्टीपासून सतर्क व्हावे म्हणून मी सोशल मीडियावर ही पावती पोस्ट केली. तेथे शेतमालाला योग्य किंमत मिळत नाही. मी शेतात हे पीक घेण्यापासून ते बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी तब्बल २५ हजार खर्च केल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Farmer 205 KG Onion Sale Only 8 Rupees Shocking