बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजा कायम राहणार असला तरीही त्याला अडचणींचा सामना करावा लागेल, अशी भविष्यवाणी भेंडवळच्या घटमांडणीने केली आहे. पाऊस, पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आर्थिक, संरक्षण व सामाजिक परिस्थिती याचा वेध घेणाऱ्या भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज आज वर्तवण्यात आले आहेत.
विशेषतः शेतकऱ्याचे लक्ष लागून असलेली बुलढाण्यातील ‘भेंडवळची घटमांडणी’चे भाकीत आज जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये राजकीय भाकीत मांडताना राजा कायम राहणार असला तरीही तो अडचणीत येणार आहे आणि कायम तणावात राहणार असल्याचे म्हटले आहे. यासोबतच राजकीय उलथापालथ होत राहील, असेही भाकित व्यक्त करण्यात आले आहे. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीही मोठ्या प्रमाणात येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
देशासाठी शेजारील राष्ट्रांच्या कुरघोड्या थोड्याफार प्रमाणात त्रासदायक ठरणार आहेत. परंतु, संरक्षणाची बाजू मजबूत असेल, असेही भाकित घटमांडणीने वर्तवले आहे. घटमांडणीत वर्तवण्यात आलेल्या अंदाजावरुन राज्यातील शेतकरी आपल्या वर्षभराचं पीक पाण्याचे नियोजन करत असतात. त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असते. आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी या मांडणीतील वर्षभराचे घटात झालेल्या बदलावरुन वर्षभराचं नियोजन आणि अंदाज वर्तवण्यात आले.
अतिवृष्टीचे संकट
जून महिन्यात कमी पाऊस पडणार असल्याने पेरणी उशिरा होईल. तर जुलै पावसाचं प्रमाण सर्वसाधारण असणार आहे. तसेच अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचे संकटही शेतकऱ्यांवर असेल. त्यामुळे पिकांचे नुकसान सहन करावे लागू शकते. अॉगस्टमध्ये पाऊस चांगला असेल तर सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण घटलेले असेल, असे भाकित घटमांडणीने वर्तवले आहे.
तूर, तांदळाचे उत्तम पिक
यावर्षी तूर आणि तांदळाचे पिक चांगल्या प्रमाणात असणार आहे. तर गव्हाचे भाव तेजीत असतील. यावर्षी पिकांवर रोगराई राहिल, असेही घटमांडणीचे भाकित म्हणते. कापसाचे पीक मध्यम होईल, ज्वारी, मूग, उडीद, तीळ, बाजरी, गहू यांचे पिक सर्वसाधारण असेल. पण तीळ, बाजरी आणि हरभऱ्याचे नुकसान होऊ शकते, असेही म्हटले आहे.
३५० वर्षांची परंपरा
३५० वर्षांपासून घट मांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जात आहे. शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येते. 350 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घट मांडणी सुरु केली होती, आणि आता त्यांचे वंशजही परंपरा कायम ठेवून आहेत. दरम्यान, या घटमांडणीवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केले आहे.
Famous Tradition Bhendwal Ghatmandani Prediction Forecast