मुंबई – कोणत्याही प्रकारचे गीत अगदी लीलया आपल्या गळ्यातून साकारणारा अवलिया म्हणजे मोहम्मद रफी. त्यांना कोणत्याही भाषेचे, गायन प्रकाराचे कसलेही बंधन नव्हते. पण, त्यांना गाणे सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
रफी यांच्या या यशामुळे त्यांना विरोध करणारे अनेक जण होते. त्यांचे करिअर ऐन भरात असताना काही मौलवींच्या सांगण्यावरून त्यांनी थेट गाणे म्हणणेच सोडून दिले होते. आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे. ही गोष्ट तेव्हाची आहे, जेंव्हा ते हजला गेले होते. तिथून परतल्यानंतर लोकांनी त्यांना सांगितले की, आता तुम्ही यात्रेवरून आला आहात, त्यामुळे तुम्ही गाणे बंद करायला हवे.
मोहम्मद रफी हे खूप सज्जन होते, त्यामुळे या लोकांचे ऐकून त्यांनी गाणे सोडण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय ऐकून बॉलीवूडमध्ये भूकंप झाला. त्यांच्या परिवाराला देखील धक्का बसला. संगीतकार नौशाद यांनीदेखील त्यांना समजावले. गाणं हीच परिवाराची रोजीरोटी आहे, असंही त्यांना समजावण्यात आलं. त्यानंतर त्यांनी न गाण्याचा आपला निर्णय मागे घेतला.
अशा या गुणी कलाकाराचे ३१ जुलै १९८० रोजी निधन झाले. हिंदी शिवायही अनेक भाषांमध्ये त्यांची गाणी आहेत. त्यांच्या नावावर जवळपास २६ हजार गाणी म्हणण्याचा रेकॉर्ड आहे.