के के आणि मी
– मिलिंद देशपांडे (ज्येष्ठ वृत्तनिवेदक, आकाशवाणी, नवी दिल्ली)
सुप्रसिद्ध गायक के के गेल्याची बातमी सकाळी वाचली आणि थोडा वेळ मन उदास झालं. के के माझा खूप क्लोज मित्र होता असं पण नाही. एक तर 53 वर्षे हे काही आयुष्यातून डिलीट व्हायचं वय नाही. त्यामुळे कदाचित थोडा धक्का बसला होता. परंतु त्याची आठवण यायचं आणखीन एक कारण म्हणजे सुमारे 1993-94 मधील. त्यावेळी आम्ही दोघे भेटलो होतो तो दिवस आठवला.
मी त्यावेळी जुन्या राजेंद्र (पंजाबी मधे राजिंदर) नगर मध्ये रहात होतो. माझ्या voice over करिअरची ती सुरुवात होती. आणि के के च्या म्युझिक करिअरची. माझ्या घराच्या मागेच साऊंड स्टुडिओ होता. आणि मला फोन आला की एक मराठी जिंगल आणि एक voice over करायचा आहे. मी तिथे पोहचलो. आणि बघितलं की एक पोरगाही तेथे बसलेला आहे. माझी ओळख करून दिल्यावर तो मुलगा म्हणाला हैलो भैय्या I am K K. म्हटलं आजकाल शॉर्ट फॉर्मचा जमाना आहे. त्यामुळे मी पण पूर्ण नाव विचारलं नाही. श्रीराम होंडा जेनसेटची जिंगल होती. मी ती लिहिली आणि मग मीटर मध्ये बरोबर येते का, हे बघून practice सुरू केली.
मी पण त्याला गाऊन दाखवत होतो आणि मराठी उच्चार कसे करायचे ते सांगत होतो. तो म्हणाला की, आप की आवाज बहोत अच्छी है. मी पण त्याच्या आवाजाला दाद दिली आणि तू मुंबईला जा तिथे खुप स्कोप आहे, असं सांगितलं. आम्ही रेकॉर्डिंग सुरू करणार होतो तेवढ्यात वीज गेली. बराच वेळ वाट बघितली पण लाइट यायची चिन्ह दिसेनात म्हणून मी घरी आलो आणि वाट बघत बसलो. रात्री दहा वाजता मला फोन आला की, आता आपण रेकॉर्डिंग करू तू ये.
इतर भाषेच्या जिंगल त्याने म्हटल्या त्यानंतर के के मराठी जिंगल गायला. मी voice over केला आणि परत भेटू असं सांगून निरोप घेतला. परत कधी भेट नाही झाली. कारण के के बहुधा मुंबईला गेला असावा. एक गायक म्हणून त्याला खूप यश मिळालं. सर्वात मोठी गंमत म्हणजे मला कितीतरी वर्ष त्याचं पूर्ण नाव माहित नव्हते. के के अचानक गेल्यामुळे त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्याच्या बरोबर एकच जिंगल केली आणि ती अश्या परिस्थितीत की मला त्या प्रसंगाची कायम आठवण राहिली. के के तू जिथे कुठे असशील तिथे तुझ्या आवाजाने सर्वांना मोहित कर, अशी ईश्वर चरणी प्रार्थना.