इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी (वय ६९) यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. डिस्को किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बप्पीदांची पाच दशकांची शानदार कारकीर्द आहे. त्यांना सोन्याच्या दागिन्यांविषयी प्रचंड आवड होती. त्यामुळे नेहमी ते सोन्याचे दागिने घालत असे. त्यामुळे त्यांना भारताचा सुवर्णपुरुष म्हणूनही ओळखले जात होते. २०१०च्या उत्तरार्धात, त्यांनी पारंपारिक सोन्याचे दागिने न घालण्याचा निर्णय घेतला आणि नवीन युगातील धातू ‘ल्युमिनेक्स युनो’ ची निवड केली.
सोन्याच्या दागिन्यांवरचे त्यांचे प्रेम अमेरिकन गायक एल्विस प्रेस्ली यांच्यापासून प्रेरित असल्याचे म्हटले जाते. सोनं घालायला या गायकाच्या प्रभावामुळे त्यांनी सुरुवात केली असली तरी काही काळाने सोनं त्यांना ‘लकी चार्म’ वाटायला लागलं होतं. त्याच्याकडे इतकं सोनं होतं की त्या सोन्याची देखभाल करण्यासाठी सहाय्यक नेमावा लागला होता. अनेक सोन्याच्या साखळ्या, अंगठ्या आणि काळा चष्मा हे बप्पी लहिरीचे ट्रेडमार्क बनले होते. बप्पीदा आपलं सर्व सोनं लॉकरमधील अतिशय सुंदर, रेखीव नक्षीकाम केलेल्या बॉक्समध्ये ठेवायचे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सर्व सोने त्यांची मुले बाप्पा आणि रेमा यांच्याकडे असेल, असे सांगितले जात आहे.
बप्पी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. सुमारे महिनाभर ते रुग्णालयात होते. सोमवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांच्या कुटूंबियांनी डॉक्टरांना बोलावले, डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. यातच त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. बप्पी लहरी यांचे मुंबईत आलिशान घर आहे, त्यांनी हे घर २००१मध्ये खरेदी केले होते. सध्या त्यांच्या घराची किंमत ३.५ कोटी रुपये आहे. बप्पी दा यांना आलिशान गाड्यांचाही शौक होता, असे म्हटले जाते. त्यांच्याकडे जगातील सर्वात महागड्या ५ कार होत्या. टेस्ला ही त्यांची एक कार होती, जी परदेशातून आयात करुन आणली होती.