मातीत रमणारा, निसर्गाची अनेक रुपे आपल्या शब्दांतून उलगडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गंजांनी ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धों. महानोर यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे. शेतकऱ्यांच्या सुख दुःखाची मांडणी करताना त्यांनी ग्रामीण जीवनाच्या विविध पैलूंवर आपल्या लेखनातून प्रकाश टाकला. ते प्रयोगशील शेतकरी होते. साहित्यिक मंच ते विधानपरिषद असा त्यांचा प्रवास राहिला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाली आहे. त्यांची उणीव निश्चितच भासत राहील अशा रानकवी ना.धों महानोर यांचा असा आहे जीवनप्रवास….
गौतम संचेती, नाशिक
ना. धों. महानोरांचा जन्म औरंगाबाद व जळगावच्या सीमारेषेवर असलेल्या ५०० लोकवस्तीच्या पळसखेडचा. एका गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात राबायचे. प्राथमिक शिक्षण पळसखेडला झाल्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षी ते पुढील शिक्षणासाठी ८-१० कि.मी. अंतरावर असलेल्या शेंदुर्णीच्या शाळेत दाखल झाले. शेंदुर्णीच्या शाळेतच कवितेशी त्यांची ओळख झाली. तेथील शिक्षकांनीच त्यांना कवितेची गोडी लावली. साहित्यावर प्रेम करणाऱ्या या शिक्षकांच्या घरी ते कामही करत असे आणि तेथे पुस्तक वाचत असे. पुढे मॅट्रिक झाल्यानंतर ते जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेत दाखल झाले. तिथे साहित्यिक असलेल्या प्राध्यापकांकडून त्यांना भरपूर प्रोत्साहन मिळालं, परंतु घरातल्या अडचणींमुळे वर्ष पूर्ण होण्याच्या आतच ते शिक्षण सोडून गावी आले. वडिलांनी पाच एकर कोरडवाहू जमीन विकत घेतली होती आणि शेतीच्या कामांसाठी त्यांना त्यांची गरज होती. त्यामुळे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण थांबलं, पण लोकशिक्षण मात्र सुरु झालं. या काळात ते दिवसभर शेतीचं काम करत असे आणि रात्री झोपडीत कंदील लावून पुस्तक वाचत असे. याच काळात त्यांनी ५०० हून अधिक पुस्तकं कंदिलाच्या प्रकाशात वाचली. त्यातून त्यांना कवी-कथा-कादंबरीकार कळत गेले आणि त्यातून औरंगाबाद-जळगावला येणाऱ्या साहित्यिकांना भेटणं, त्यांना पत्र पाठवणं असा व्यवहार सुरू झाला. यातूनच ते पुढे साहित्याकडे वळले.
१९६७ साली पहिला कवितासंग्रह प्रकाशित
अवघ्या १९ वर्षांचे असतांना ते शेतात काम करत, येथे पाठ असलेल्या कविता गुणगुणत असे. कधी कधी एखाद्या कवितेच्या चार ओळी आठवायच्या, पुढच्या आठवत नसत. मग ते पुढच्या ओळी ते त्या मीटरमध्ये रचत असे आणि कविता पूर्ण करत असे. त्यातून त्यांना कवितेचा लळा लागला. पण त्यानंतर त्यांना आपण उसणवार कवी असल्याची जाणीव झाली. त्यानंतर ते स्वतःची कविता लिहायला लागलो. वर्षभरातच त्यांनी अनेक कविता लिहिल्या, त्याही शेतातील हिशेबाच्या छोट्याशा पॉकेट डायरीवर. या डायरीवर मजुरांचे हिशेब, इलेक्ट्रिक पंपाचे पार्टचे हिशेब लिहिलेले असत. त्यावरच ते कविता लिहीत गेले. पुढे यातील ८ कविता औरंगाबादच्या ‘प्रतिष्ठान’ आणि ४ कविता ‘मौज’च्या दिवाळी अंकाला त्यांनी दिल्या. या कवितांना वाचक आणि जाणकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पुढे अशाच छापून आलेल्या आणि काही अप्रकाशित कविता एकत्र करून ‘रानातल्या कविता’ हा त्यांचा कवितासंग्रह १९६७ साली ‘पॉप्युलर प्रकाशन’ने प्रकाशित केला. याचवेळेस ग्रेसच्या ‘संध्याकाळच्या कविता’ हा काव्यासंग्रहही पॉप्युलरने प्रकाशित केला. या दोन्ही कवितासंग्रहांना राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला. त्यातून त्यांना खूप प्रसिध्दी मिळाली. त्यानंतर ते सातत्याने कविता लिहीत राहिले. त्यांच्या या कवितेत निसर्ग होता, शेती होती. त्यावेळेस शेतीला चांगले दिवस होते, दुष्काळ नव्हता. त्यामुळे त्या कविता निसर्गाचं भरभरुन वर्णन करणाऱ्या होत्या. मात्र १९७२ नंतर दुष्काळ व शेतीसाठी काळ बरा राहिला नाही. शेतकऱ्यांचं दुःखही वाढत गेलं, त्यामुळे त्याचं प्रतिबिंब पुढे त्यांच्या कवितेत उमटत गेलं. त्यामुळे त्यांच्या कवितेचे असे दोन कालखंड आहेत.
पहिलं प्रेम कविता
ना. धों. महानोरांचा ‘रानातल्या कविता’ हा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर ११ कवितासंग्रहांबरोबरच ‘अजिंठा’, ‘राजा छत्रपती शिवाजी’, सानेगुरुजींवर खंडकाव्यं लिहिली. कवितेबरोबरच ‘वही’ आणि ‘पळसखेडची गाणी’ हे त्यांचे लोकगीतांचे संग्रह आहेत. तसंच ‘गांधारी’ ही कादंबरी, ‘गपसप’ व ‘गावाकडच्या गोष्टी’ हे लोककथांचे संग्रह, ‘ऐशी कळवळ्याची जाती’ हा व्यक्तिचित्रणात्मक ललित लेखांचा संग्रह… असं विविधांगी ललित लेखन त्यांनी केले. याशिवाय ‘यशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार’, ‘शरद पवार आणि मी’ तसेच ‘आनंदयोगी पु.ल.’ या पुस्तकांमधून महाराष्ट्रातील मोठी व्यक्तिमत्त्वं उलगडण्याचा प्रयत्न केला. हे सारं गद्यलेखन निमित्ताने आणि गरज म्हणून त्यांनी केले. पण, त्यांचे पहिलं प्रेम कविता हेच राहिलं.
महानोर व मंगेशकर कुटुंबिय
रानातल्या कविता सर्वत्र गाजत असतानाच एके दिवशी मंगेशकर कुटुबियांकडून त्यांची निर्मिती असलेल्या ‘जैत रे जैत’ या चित्रपटातील गाणी लिहिण्याचा प्रस्ताव त्यांना दिला. या चित्रपटाचं दिग्दर्शन जब्बार पटेल करणार होते, तर मोहन आकाशे, स्मिता पाटील असे मोठे कलाकार त्यात काम करणार होते. सिनेमाचं संगीत हृदयनाथ मंगेशकर देणार होते आणि अर्थातच गाणी लता मंगेशकर गाणार होत्या. हृदयनाथ आणि लताबाईंनी हा चित्रपट संगीतमय करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यासाठी त्यांनी तब्बल १६ गाणी हवी होती. ती जबाबदारी त्यांनी कवी महानोरांवर टाकली होती. पण या दिग्गजांची नावं पाहूनच, हे जमणार नाही, असं सांगून त्यांनी अगोदर नम्रपणे नकार कळवला. हृदयनाथ आणि लताबाई आपल्या म्हणण्यावर ठाम होत्या. त्यांनी त्यांच्या घरी ‘प्रभुकुंज’मध्ये तीन दिवस त्यांना कोंडून ठेवलं. त्या जबाबदारीच्या भानातून त्यांनी तब्बल १६ गाणी लिहिली, जी पुढे खूप गाजली. त्यानंतर ‘एक होता विदूषक’, ‘सर्जा’ यासह तब्बल ११ चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहली.
पळसखेड न सोडण्यामागे हे आहे कारण
पळसखेड आणि तिथली शेती त्यांचा जीव की प्राण होता. येथे अनेक कवींच्या ओळी शेतातील झाडांना लावल्या त्यांनी लावल्या. शेतात-मळ्यात आलं की त्यानेच पाहुण्यांचं स्वागत होतं. शेतात नवनवीन प्रयोग करतानाच त्यांनी या मळ्यातच ७ लाख रुपये किंमतीचं स्वतःचं असं पुस्तकांचं ग्रंथालय तयार केलं आहे. तसंच त्यात दोन खोल्या खास पारितोषिकांसाठी तयार करुन घेतल्यात. एखाद्या छोट्या कार्यक्रमसाठी व्यासपीठही तयार केलं आहे. घरात आत पुस्तकं आणि बाहेर मळ्यात सीताफळ, मोसंबी ,केळी, आंबा ह्या फळपीकांबरोबर तुर, कापूस व इतर पीकं ते घेत. छोटी-छोटी तळी व दाट झाडी यामुळे त्यांना कवितानिर्मितीला प्रोत्साहन मिळत असल्यामुळे त्यांनी पळसखेड सोडले नाही. या मळ्याला अनेक साहित्यिक व दिग्गज नेत्यांनी भेटी दिल्यात. इथे मुक्कामही केला आहे.
य़शवंतरावांचा जिव्हाळा वाढत गेला
इचलकंरजीच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील कवीसंमेलनात कवी महानोरांनी त्यांची रानातली कविता वाचली, तेव्हा यशवंतराव चव्हाण प्रेक्षकांमध्ये होते. या कवितेला रसिकांनी खूप दाद दिली. त्यावेळेस यशवंतरावांनी रात्री पुन्हा कविता ऐकवण्यासाठी महानोरांना आमंत्रण देऊन, तिथेच मुक्काम ठोकला. डेक्कन स्पिनींग मिलमध्ये त्यांना बोलावलं व कवितांचा भरपूर आनंद घेतला. त्यानंतर ते त्यांच्या भाषणातही महानोरांच्या कविता वापरू लागले. त्यातून महानोरांचा व य़शवंतरावांचा जिव्हाळा वाढत गेला. पुढे महानोरांचे वडील वारल्यानंतर ते केंद्रीय परराष्ट्रमंत्री असतांनाही पळखेडला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व पाच सहा मंत्र्याबरोबर सकाळी पळसखेडला घरी आले. सकाळी दहाला आले ते सायंकाळी ४ पर्यंत थांबले होते. पुढे हे संबध कायमस्वरुपी टिकले असे महानोर सांगत असे.
शरद पवारांशी पहिल्यांदा संबध कवितेऐवजी शेतीमुळे
शरद पवारांशीही त्यांचा संबध पहिल्यांदा कवितेऐवजी शेतीमुळे आला. त्यांनीच महानोरांना दोन वेळा आमदारपदाची संधी दिली आणि त्यातून त्यांनी शेतीसाठी-साहित्यासाठी बरीच कामं केली. १९७८ ते १९८४ आणि ११९० ते १९९६ असा दोनदा विधान परिषदेचे ते आमदार झाले. या दोन्ही कार्यकाळांत त्यांनी साहित्य-कला-संस्कृती आणि शेतीच्या प्रश्नावर अनेक प्रस्ताव मांडले व त्यातील बहुतांश मान्यही झाले. नवोदितांच्या पहिल्या पुस्तकाला शासकीय अनुदान देण्याची योजना त्यांच्या आमदारकीच्या पहिल्या काळात लागू झाली. त्यानंतर दुस-या कार्यकाळात त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच पु. ल. देशपांडे कला अकादमी स्थापन झाली. साहित्याबरोबरच आमदार महानोरांनी सुचवलेल्या शेती व पाणीविषयक अनेक योजनाही शासनाने स्वीकारल्या. १९८४ मध्ये महाराष्ट्र राज्याने स्वीकारलेली ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही योजना आणि घोषणाही महानोरांची आहे.
famous nature poet na dho mahanor passed away life journey
marathi literaure agriculture farmer padmashri mla