विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना सुद्धा कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ‘अगंबाई सुनबाई’ या मराठी मालिकेचे गोव्यात शुटींग सुरु असताना जोशी यांच्यासह अन्य चार जणही कोरोना बाधित झाले आहेत. त्यात दोन लाइटमन, कला विभागाचा सदस्य आणि वाहन चालक यांचा समावेश आहे. आता मालिकेच्या सेटवर कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर शोची संपूर्ण टीम मुंबईत परतली आहे.
कोरोना बाधित झाल्यानंतर मोहन जोशी यांना गोव्यातील हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. याबाबत जोशी म्हणाले की, मी ६ मार्च रोजी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आणि दुसरा डोस २० एप्रिलला घेतला. सध्या माझी तब्येत ठीक असून पूर्वीपेक्षा बरे वाटत आहे. आता एका आठवड्यानंतर पुन्हा कोरोना चाचणीची प्रतिक्षा आहे. कोरोना चाचणी निगेटिव्ह झाल्यानंतर मी गोव्याहून मुंबईला परत येणार असल्याचे जोशी म्हणाले.
मुंबईत कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कडक लॉकडाऊन लावण्यात आले होते, त्यामुळे तेथील चित्रपट व मालिकांचे शूटिंग बंद झाले होते. त्यानंतर मुंबईतील अनेक निर्माते, दिग्दर्शक व कलाकार त्यांच्या शोच्या शुटींगसाठी गोव्यात गेले होते, पण आता गोव्यात देखील शुटींगला बंदी घातली आहे.