लखनऊ (उत्तर प्रदेश) – मेरठ येथील एका घटनेत असा काही गोंधळ झाला की अख्ख्या कुटुंबानेच धरणे आंदोलन छेडले आहे. मोहोल्ला मुन्नालाल याठिकाणी झालेल्या वादात तीन लोकांची नावे अकारण गोवण्यात आल्याचे हे प्रकरण आहे. हिंदू संघटनेतील पदाधिकाऱ्यांवर सुद्धा या कुटुंबाबद्दल जातिवादच व असभ्य भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित कुटुंबाने सामूहिक धर्म परिवर्तनाचा इशारा दिल्यामुळे जास्तच गोंधळ उडाला आहे.
पोलीस प्रशासनालाही कार्यवाहीसाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. मवाना येथील मोहोल्ला मुन्नालाल परिसरात तीन दिवसांपूर्वी दोन गटांमधील मुलांमध्ये वाद झाला. यादरम्यान दलित गटाचे राजू, मोनू आणि अंकित यांच्यासह जवळपास बारा लोकांच्याविरोधात दुसऱ्या गटाने तक्रार दाखल केली. दलित गटाने याला विरोध करीत अकारण गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले.
अर्जून, मोनू आणि अंकित हे तिघेही एका हिंदू संघटनेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांनाही फोन करून प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. दरम्यान तक्रारकर्त्या गटाने हिंदू संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आपल्यासोबत वाद घातला, शिवीगाळ केली आणि जातिवाचक शब्द वापरल्याचा आरोप केला आहे. त्याच्याच निषेधार्थ पीडित कुटुंबातील सदस्यांनी आपल्या समाजातील कार्यकर्त्यांसोबत परिसरातील मंदिरातच धरणे आंदोलन सुरू केले. या दरम्यान १००हून अधिक लोकांनी धर्म परिवर्तनाची धमकीही प्रशासनाला दिली आहे. या धमकीमुळे पोलीस प्रशासन चांगलेच हलून गेले आहे. सर्व कुटुंबांनी पोलीस प्रशासनाला तीन दिवसांचा वेळ दिला आहे. तीन दिवसांत गुन्ह्यांमधून नाव हटविले नाही, तर सगळेच धर्मपरिवर्तन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे हिंदू संघटनेने मात्र या प्रकरणाबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले आहे.