नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुलगी प्रौढ असल्याचे सांगत तिला देखभालीची मागणी करण्याचा अधिकार नसल्याची मागणी करणारी याचिका कौटुंबिक न्यायालयाने फेटाळली आहे. मुलगी प्रौढ असली तरी तिला दहा हजार रुपये देखभालीसाठी वडिलांना द्यावे लागतील, असा निकाल कडकडडूम्मा कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे. पोटगी संदर्भात हा निकाल अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे.
न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, कायद्यानुसार मुलगी केवळ वयात येईपर्यंतच नाही तर लग्नाआधीही तिचा सर्व खर्च वडिलांकडून घेऊ शकते. जर वडिलांनी सांगितले की ते आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि मुलीला भरणपोषण देऊ शकत नाहीत, तर वडिलांच्या स्थितीनुसार मुलीला भरण पोषणाचा हक्क असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
१९ वर्षीय मुलीने उच्च शिक्षणाचा खर्च देण्याची मागणी वडिलांकडे केली. मात्र, त्यांनी ती नाकारली. अखेर तिने न्यायालयात धाव घेतली. वडील व्यवसायाने व्यापारी आहेत, मात्र मुलगी प्रौढ असल्याचे कारण देत शिक्षणाचा खर्च उचलण्यास ते तयार नव्हते. वडिलांनी सांगितले की, ती लहानपणापासूनच आईसोबत आहे, त्यामुळे मुलीला उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर ती जबाबदारी माझी नाही. त्यावर न्यायालयाने वडिलांना फटकारले आणि सांगितले की, बाप हा मुलांसाठी छतासारखा असतो. अर्थातच मुलगी वेगळी झाली आहे, पण जर वडील मुलीला उच्च शिक्षण देण्यासाठी सक्षम असतील तर त्यांना हे कर्तव्य पार पाडावेच लागेल. मुलीच्या उच्च शिक्षणाचा सर्व खर्च वडिलांनी उचलण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
१९ वर्षीय मुलीच्या आई आणि वडिलांचा सात वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे. वडिलांनी दुसरं लग्न केले आहे. आई एका खाजगी शाळेत शिक्षिका आहे. आईच्या पगारातून घर चालवता येत नाही, तर वडील व्यापारी आहेत. त्यांचे मासिक उत्पन्न हे तीन लाखांहून अधिक आहे, मात्र ते खर्च भागवत नाहीत, असे मुलीने याचिकेत म्हटले आहे.
न्यायालयाने सांगितले की, मुलीसाठी, कायदा विशेषत: असे नमूद करतो की, जोपर्यंत मुलगी स्वतःचा खर्च उचलू शकत नाही तोपर्यंत ती वडिलांची जबाबदारी आहे. लग्नानंतर ही जबाबदारी आपोआप तिच्या पतीकडे जाते. त्यापूर्वी, वडील कोणत्याही परिस्थितीत मुलीचा खर्च उचलण्यापासून नकार देऊ शकत नाहीत.
वडिलांच्या वतीने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची वार्षिक उलाढाल १५ लाखांहून अधिक असल्याचेही समजते. वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली असूनही ते आपल्या मुलीवर खर्च करण्यास तयार नव्हते. अशा परिस्थितीत सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने मुलीच्या पालनपोषणासह तिच्या शिक्षणाचा खर्च वडिलांना उचलण्याचे आदेश दिले आहेत.
family court big decision adult daughter pay maintenance father legal