नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा रुग्णालयात पैसे घेऊन बोगस वैद्यकिय प्रमाणपत्र देणा-या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. ऑपरेशन झालेले नसतांनाही बनावट प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याचे हे प्रकरण समोर आले आहे. या बनावट प्रमाणपत्र प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट मॅनसह, ग्रामीण पोलीस मुख्यालयातील लिपिक महिलेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात नाशिक, धुळे जिल्ह्यातील ३ अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक पोलिसांच्या रडारवर आहे. या प्रकरणात जिल्हा रुग्णालय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह खासगी हॉस्पिटलचीही करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस तपासात आत्तापर्यंत २४ बनावट प्रमाणपत्र आढळले आहे. गंभीर आजारांच्या बहाण्याने शासकीय योजना आणि सोयीच्या ठिकाणी बदल्यांसाठी बनावट प्रमाणपत्रांचा हा गोरख धंदा सुरु होता. नाशिकचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. अनेक दिवसांपासून हे बनावट प्रमाणपत्राचे रॅकेट सुरु होते. या रॅकेटमध्ये पैसे घेऊन बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात येत होते.