मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागामार्फत मेसर्स सूर्या एंटरप्रायजेस या व्यापार संस्थेविरोधात सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने एकूण २०.२० कोटी रुपयांच्या बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट (ITC) प्रकरणात संस्थेचे मालक निखिल नरेश वालेचा (वय २८ वर्षे) यास अटक करण्यात आली आहे. तर दुस-या कारवाईत मे. अॅक्युरेट एंटरप्रायजेस (GSTIN: 27AAZFA6898H2ZE) या भागीदारी व्यवसायाविरुद्ध तपासात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान बनावट खरेदी दाखवून वस्तू व सेवा करांतर्गत खोटी कर सवलत (इनपुट टॅक्स क्रेडिट) घेऊन सुमारे रुपये ९.१९ कोटींची महसूल हानी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी जबाबदार व्यक्ती त्रिभुवन सिन्हा (वय ५०) आणि अख्तर खान (वय ५५) यांना दिनांक २१ जुलै २०२५ रोजी अटक करण्यात आली असून, अप्पर मुख्य महानगर दंडाधिकारी, मुंबई यांनी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पहिल्या कारवाई ८ सप्टेंबर, २०२१ रोजी वस्तू व सेवा कर कायद्यान्वये नोंदणीकृत झाली असून, संबंधित व्यक्तीने कोणतीही वस्तू अथवा सेवा प्रत्यक्षात न प्राप्त करता, तसेच कोणत्याही वस्तूंची देवाण-घेवाण न करता, फसवणूक करणाऱ्या पद्धतीने बनावट बीजकांच्या आधारे ITC प्राप्त केल्याचे निदर्शनास आले आहे.
तपासादरम्यान व्यापाराच्या नोंदणीकृत पत्त्यावर भेट दिल्यानंतर असे आढळून आले की, आरोपीने १७.०३ कोटी रुपयांचे बनावट ITC अस्तित्वात नसलेल्या संस्थांच्या माध्यमातून प्राप्त केले असून, ३.०३ कोटी रुपयांचे अतिरिक्त ITC चुकीच्या पद्धतीने GST विवरणपत्रांमध्ये दाखविण्यात आले होते. या व्यवहारांसाठी कोणतीही वस्तू अथवा सेवा प्रत्यक्षात प्राप्त झालेली नव्हती.
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, उल्हासनगर यांनी निखिल वालेचा यास दि. ३० जुलै २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ही कारवाई राज्य वस्तू व सेवा कर विभागामार्फत बनावट बीजक व खोट्या व्यवहारांद्वारे केली जाणारी करचोरी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या विशेष तपास मोहिमेअंतर्गत करण्यात आली. कारवाई राज्यकर सहायक आयुक्त संतोष लोंढे, कर अधिकारी दीप्ती पिलारे, सुजीत कक्कड, संतोष खेडकर तसेच निरीक्षक व कर सहाय्यक यांच्या विशेष पथकाच्या मदतीने करण्यात आली.
संपूर्ण तपास राज्यकर सह आयुक्त (अन्वेषण-क), मुंबई यांच्या आदेशानुसार व राज्यकर उपआयुक्त यास्मीन अजीम मोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आला. ही कारवाई चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील राज्य जीएसटी विभागाची पाचवी अटक असून, करचोरी, बनावट बीजक निर्मिती, खोट्या उलाढाली दाखविणे व बेकायदेशीरपणे ITC मिळविणे अथवा हस्तांतरित करणे यांच्याविरोधात विभागाने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.
दुसरी कारवाईत दोन आरोपींना अटक
दुस-या कारवाईत राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागामार्फत बोगस बिलिंग प्रकरणी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मे. अॅक्युरेट एंटरप्रायजेस (GSTIN: 27AAZFA6898H2ZE) या भागीदारी व्यवसायाविरुद्ध तपासात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान बनावट खरेदी दाखवून वस्तू व सेवा करांतर्गत खोटी कर सवलत (इनपुट टॅक्स क्रेडिट) घेऊन सुमारे रुपये ९.१९ कोटींची महसूल हानी करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी जबाबदार व्यक्ती त्रिभुवन सिन्हा (वय ५०) आणि अख्तर खान (वय ५५) यांना दिनांक २१ जुलै २०२५ रोजी अटक करण्यात आली असून, अप्पर मुख्य महानगर दंडाधिकारी, मुंबई यांनी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई सहायक राज्यकर आयुक्त चंदर कांबळे, दादासाहेब शिंदे, राजेश बदर (अन्वेषण ‘अ’, मुंबई) यांनी राज्यकर सहआयुक्त (भा.प्र.से.) प्रेरणा देशभ्रतार आणि राज्यकर उपायुक्त अनिल कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.या कारवाईत राज्यकर निरीक्षकांचे विशेष सहकार्य लाभले.
राज्य वस्तू व सेवा कर विभागाने सर्वसमावेशक नेटवर्क विश्लेषण साधने वापरून आणि अन्य संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत अशा प्रकारच्या करचुकवेगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविरोधात कठोर कारवाई सुरू ठेवली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ही सहावी आणि सातवी अटक आहे.