नवी दिल्ली/मुंबई – आजच्या काळात गॅस सिलेंडर आणि प्रेशर कुकर या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या अत्यंत आवश्यक गोष्ट आहेत. परंतु अनेक वेळा गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने किंवा प्रेशर कुकर उडाल्याने मोठ्या दुर्घटना घडल्याचे दिसून येते, याला एक कारण म्हणजे बनावट गॅस सिलेंडरची आणि बनावट प्रेशर कुकरची विक्री होय. त्याचप्रमाणे काही वेळा दुचाकी अपघातात हेल्मेट घालूनही वाहनचालकास डोक्याला मार लागतो, याला कारण म्हणजे बनावट हेल्मेटची विक्री होय. आता या तीन बनावट वस्तूंची ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांवर धडक आणि कडक कारवाई करण्यात येणार आहे.
जीवनात अपघात झाल्यास जीवघेणा ठरणाऱ्या बनावट उत्पादनांची विक्री आणि निर्मिती थांबवण्यासाठी सरकार देशव्यापी मोहीम राबवणार आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) सांगितले की, बनावट घरगुती वापराच्या उत्पादनांच्या विक्री विरोधात मोहीम तीव्र केली आहे. प्रेशर कुकर, दुचाकी हेल्मेट आणि बनावट ‘आयएसआय मार्क’ असलेले स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची विक्री करणाऱ्यांविरोधात जनहितार्थ ही मोहीम राबवण्यात येत असल्याचेही ग्राहक संरक्षण नियामकाने सांगितले.
सीसीपीएच्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी सांगितले की, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएम मॉलसह पाच ई-कॉमर्स कंपन्यांना आधीच नोटीस बजावली आहे. आम्ही केवळ ऑफलाइन बाजारातच नव्हे, तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही बनावट उत्पादने विकणाऱ्यांविरुद्ध पाळत ठेवत आहोत, असे खरे यांनी सांगितले. प्रेशर कुकर, दुचाकी हेल्मेट आणि एलपीजी सिलेंडर या आम्ही तीन उत्पादनांची ओळख मिळवली आहे. या तीन बनावट वस्तू विकणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे खरे यांनी स्पष्ट केले आहे.
ज्या कंपन्यांविरुद्ध ग्राहक हक्कांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी आल्या आहेत, त्यांची चौकशी करण्याचे आदेश सीसीपीएने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकारात ही चौकशी करतील आणि येत्या दोन महिन्यांत याबाबत अहवाल देतील, असे खरे म्हणाले. याशिवाय, बनावट उत्पादनांची विक्री रोखण्यासाठी सीसीपीए सर्व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवत आहे.
सीसीपीएने म्हटले की, कोणतीही वस्तू खरेदी करताना ग्राहक संरक्षणासाठी BIS चे भारतीय मानक (ISI) चिन्ह तपासण्याचे निश्चित करावे. ग्राहक उत्पादनांच्या वैशिष्ट्यांमध्ये ISI चिन्ह पाहिल्यानंतरच वेबसाइटवर ऑर्डर देतात. त्यामुळे प्रेशर कुकर, दुचाकी हेल्मेट आणि एलपीजी सिलिंडरची आयएस चिन्हाशिवाय विक्री करता येणार नाही, याची विक्रेते व ग्राहकांनी जाणीव ठेवावी, असेही सीसीपीएने बजावले आहे.