नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दक्षिण काश्मीरच्या अमशीपुरा भागात जुलै २०२० रोजी बनावट चकमकीत तीन व्यक्तींची हत्या केल्याप्रकरणी एका कॅप्टनविरोधात कोर्ट मार्शलची कार्यवाही सुरू झाली आहे, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. जवानांनी सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (आफस्पा) अंतर्गत मिळेल्या अधिकाराच्या पुढे जाऊन ही कारवाई केली होती, असे
कोर्ट ऑफ इन्क्वायरीमध्ये आढळले आहे.
जम्मूतील राजौरी जिल्ह्यात राहणारे इम्तियाज अहमद, अबरार अहमद आणि मोहम्मद इब्रार यांना १८ जुलै २०२० मध्ये शोपियां जिल्ह्यातील दुर्गम पर्वतीय गावामध्ये ठार केले होते. ते दहशतवादी होते असे सांगण्यात आले होते. तथापि, त्यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर संशय व्यक्त करण्यात आला, तेव्हा लष्कराने त्वरित कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरू केली. या तपासादरम्यान सैनिकांनी आफस्पाअंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा दुरुपयोग केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे मिळाले.
दहशतवादविरोधी कारवायांच्या नैतिक आचरणासाठी आपली सर्वोच्च निकष आणि कटिबद्धता कायम ठेवत कॅप्टन भूपिंदर सिंह यांच्याविरुद्ध कोर्ट मार्शलची कार्यवाही सुरू केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोर्ट ऑफ इन्क्वायरी केल्यानंतर डिसेंबर २०२० च्या शेवटच्या आठवड्यात लिखित पुरावे नोंदवण्याचे काम पूर्ण झाले होते. आता संबंधित अधिकारी पुढील कारवाईसाठी कायदेशीर सल्लागारांकडून सल्ला घेतल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
बनावट चकमकीची बातमी पसरल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्वरित तपास पथक स्थापन केले होते. शोपियां जिल्ह्यातील पर्वतीय परिसरात बनावट चकमकीत तीन नागरिकांची हत्या करण्याच्या आरोपाखाली कॅप्टन सिंह यांच्यासह तीन जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.
कॅप्टन सिंह यांनी आपले वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांना या चकमकीदरम्यान जप्त करण्यात आल्याबाबत चुकीची माहिती दिली होती. पोलिसांच्या आरोपपत्रात ताबीश नजीर आणि बिलाल अहमद या दोन आरोपींची नावे आहेत. दोघेही सामान्य नागरिक आहेत.
तिन्ही आरोपींवर बनावट चकमकीचे नाटक रचून पुरावे मिटवल्याचा आरोप आहे. त्यांनी रोख बक्षीस मिळवण्याच्या उद्देशाने खोट्या माहितीच्या आधारावर ही कारवाई केली होती. परंतु कॅप्टन सिंह यांनी रोख बक्षीस मिळवण्याच्या उद्देशाने हा बनाव रचल्याच्या आरोपचा लष्कराने इन्कार केला आहे. कॅप्टन सिंह यांनी पुरावे नष्ट केले, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.