मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्यातील बनावट डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमार्फत ‘नो युवर डॉक्टर’ ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
विधानसभा सदस्य संजय दरेकर, धर्मरावबाबा आत्राम यांनी यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता.
‘नो युवर डॉक्टर’ या डिजिटल प्रणालीवर रुग्ण क्यूआर कोडद्वारे डॉक्टरांची ओळखपत्रे, डॉक्टरांचे स्पेशलायजेशन, नोंदणी क्रमांक हे तपशील पाहू शकतो. तसेच बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरिता जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली आहे. बोगस डॉक्टर विरोधात मोहीम सुरू आहे, असेही श्री. मुश्रीफ यांनी सभागृहात सांगितले.
सदस्य नाना पटोले यांनी उपप्रश्न विचारला.