नवी दिल्ली – नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत लुबाडणाऱ्यांची संख्या भारतात कमी नाही. केवळ मोठ्या शहरांमध्ये नव्हे तर प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात अश्यांची संख्या खूप आहे. पण काही हाती लागतात, काही मोकाट सुटतात. असाच एक आरोपी अलीकडेच पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याने आतापर्यंत हजारपेक्षा अधिक बेरोजगारांना सरकारी नोकरी लावून देतो म्हणून गंडवले आहे.
दिल्लीतील चाणक्यपूरी पोलीस आणि कोलकाता पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. चाणक्यपूरी येथील हॉटेल ताज पॅलेस या फाईव्ह स्टार हॉटेलमधून एका सीबीआयच्या बोगस संचालकाला पोलिसांनी अटक केली. आरोपीने सीबीआयचा अतिरिक्त संचालक सांगून कोलकाता येथील एका तरुणीशी लग्न केले. त्याचवेळी तो देशभरातील तरुणांना सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिषही देत होता. त्यातून त्याने मोठ्या प्रमाणात पैसाही कमावला.
पश्चिम बंगालसह संपूर्ण देशात त्याने आपला मायाजाल पसरवला. पैसा घेऊन दिल्लीहून नेपाळला पळ काढण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली. नेपाळला जाण्यासाठीच तो दिल्लीत दाखल झाला होता. एरवी तो जेव्हाही दिल्लीत यायचा सीबीआय मुख्यालयाच्या आसपास फिरायचा आणि फाईव्हस्टार हॉटेलमध्ये मुक्काम करायचा. पश्चिम बंगाल पोलीस शुभोदीप बॅनर्जी (२६) याच्या शोधात दिल्लीत दाखल झाले. विशेष म्हणजे अटक झाली तेव्हा सुद्धा तो स्वतः सीबीआयचा अतिरिक्त संचालक सांगत होता. पण फटके पडल्यावर खरे बोलायला लागला.
तरुणीला फसवले
कोलकाता येथे एका तरुणीला आपण सीबीआयमध्ये अतिरिक्त संचालक आहोत हे सांगून फसवले. त्यानंतर तिच्याशी लग्न केले. पण आपला नवरा सीबीआय आफिसर नसून खासगी कंपनीत नोकरी करतो, हे कळल्यावर तिला धक्का बसला. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार केली. त्यामुळे प्रकरण उघडकीस येऊ शकले. एका तरुणाकडून नोकरी लावून देण्यासाठी तो तीन ते चार लाख रुपये घ्यायचा.