मुंबई – सोशल मीडियाचा प्रमुख प्लॅटफॉर्म समजले जाणारे Facebook Inc. आता कंपनीचे नाव बदलून या सोशल मीडिया ब्रँडचे नव्याने सादरीकरण करणार आहे. फेसबुक पुढील आठवड्यात आपले नाव बदलण्याचे नियोजन करत आहे. याच संदर्भात कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग २८ ऑक्टोबरला होणार्या कंपनीच्या वार्षिक संमेलनात माहिती देणार आहेत.
माध्यमांच्या वृत्तांनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपेक्षा अधिक ओळखले जावे यासाठी नाव बदलण्याचा निर्णय कंपनीला घ्यायचा आहे. परंतु अफवा किंवा तर्कवितर्कांवर आपण वक्तव्य करणार नाही, असे सांगत कंपनीच्या प्रवक्त्यांनी बोलण्यास नकार दिला. व्यावसायिक पद्धतीमुळे फेसबुकला अमेरिकी सरकारकडून चौकशीचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेतील दोन्ही प्रमुख पक्षाच्या खासदारांच्या वाढत्या रोषामुळे फेसबुकवर टीकास्त्र सोडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर कंपनीकडून नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, युरोपीय युनियनमध्ये दहा हजार नागरिकांना नोकर्या देणार असल्याचे फेसबुकने नुकतेच जाहीर केले होते. कंपनीला metaverse बनविण्यासाठी ही भरती केली जाणार आहे. metaverse हे नवे ऑनलाइन जग आहे. तिथे उपस्थित नागरिक शेअर्ड व्हर्च्युअल स्पेसमध्ये संवाद साधू शकतात. फेसबुकने virtual reality (VR) आणि augmented reality (AR) मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. यामध्ये आपल्या तीन अब्ज युजर्सना अनेक डिव्हाइस आणि अॅप्सच्या माध्यमातून जोडण्याची फेसबुकची इच्छा आहे.