लखनऊ (उत्तर प्रदेश) – फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, ट्विटरसारख्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे पेज काढून अनेक जण आपला अजेंडा राबवत असतात. त्यावर पोस्ट केलेल्या माहिती (कंटेट) मुळे अनेकांच्या भावना दुखावल्या जातात. पेजविरुद्ध संबंधित प्लॅटफर्मकडे किंवा सायबर सेलकडे तक्रार केली जाते. नंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाते. उत्तर प्रदेशात भावना दुखावल्याने चक्क एका कार्यकर्त्याने फेसबुक पेज आणि फेसबुकच्या मालकाविरुद्ध तक्रार दिली आणि पोलिसांनी गुन्हाही नोंदवला. परंतु पोलिसांना असे करणे महागात पडले.
न्यायालयाचा आदेश न मानल्याने उत्तरप्रदेश पोलिस अडचणीत आले आहेत. एका प्रकरणात पोलिसांनी थेट फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांचेच नाव प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) नोंदविल्यावरून न्यायदंडाधिकार्यांनी पोलिस निरीक्षकांना फटकारले आहे. तसेच पोलिस ठाणे सर्व्हिस बुकमध्ये त्याचा उल्लेख करण्यास सांगण्यात आले आहे. जिल्हा न्यायालयात न्यायदंडाधिकारी धर्मवीर यांनी अमित कुमार यादव विरुद्ध बुआ बबुआ या फेसबुक पेज अॅडमिनच्या खटल्यामध्ये हा आदेश दिला आहे. संबंधित पोलिस ठाण्यात कोणत्याही व्यक्ती विशेषचे नाव न लिहिता अज्ञाताचे नाव प्राथमिक अहवालात लिहावे, असे आदेश न्यायदंडाधिकार्यांनी दिले आहेत.
तरीही ठठिया पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रयाग नारायण वाजपेयी यांनी न्यायदंडाधिकार्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून २९ नोव्हेंबरला नोंदविलेल्या तक्रारीत फेसबुकचे मालक मार्क झुकबर्ग आणि अॅडमिनसह एकूण ४९ इतर व्यक्तीं असलेल्यया बुआ-बबुआ पेजला आरोपी बनविले. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात ठठिया पोलिस ठाण्यात तैनात पोलिस निरीक्षक वाजपेयी यांची बाजू ऐकून घेण्यासाठी सीयूसी नंबरवर दोनदा फोन करण्यात आला, परंतु त्यांनी फोन उचलला नाही.
काय आहे प्रकरण
न्यायालयात १५६/३ अंतर्गत ठठिया पोलिस ठाणे हद्दीतील सरहटी गावातील रहिवासी अमित यादव यांनी बुआ-बबुआ या नावाने फेसबुक पेज बनवण्यावर आक्षेप घेतला होता. त्यावर अॅडमिन आणि फेसबुकच्या मालकांना आरोपी बनविण्यात आले. तक्रारकर्ता समाजवादी पार्टीच्या विचारावर चालणारा कार्यकर्ता आहे. या फेसबुक पेजवर समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. त्यामुळे पार्टी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांच्यात आक्रोश आहे.